जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२: ग्रामपंचायत म्हसोबावाडी आणि सिटी हेल्थकेअर हॉस्पिटल, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे शिबिर महादेव मंदिर परिसरात दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत पार पडले.
शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर (RBSL, HBA1C), हाडांची घनता तपासणी यांसह एक्स-रे वर विशेष सवलत देण्यात आली. तसेच गुडघे व नितंब प्रत्यारोपण (Total Knee & Hip Replacement) शस्त्रक्रियांसाठीही सवलतीची घोषणा करण्यात आली.
या शिबिराला युवक राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संदीप चांदगुडे, सरपंच राजेंद्र राऊत उपस्थित होते. तसेच डॉ. अमोल चांदगुडे, डॉ. इशान गजबे आणि डॉ. ज्ञानेश्वर घाडगे यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन लाभले. त्यांनी उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हाडांची ठिसूळता, पाठदुखी, मानदुखी व वृद्धापकाळातील गुडघेदुखी यांसारख्या आजारांवरील निदान, प्रतिबंध आणि उपचारांबाबत सविस्तर माहिती दिली.
ग्रामस्थांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिराचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सिटी हेल्थकेअर हॉस्पिटलचे किशोर जांबले, किरण राठोड तसेच सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य यांचे ग्रामस्थांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
उपस्थितांमध्ये धीरज चांदगुडे, पंकज चांदगुडे, दत्तात्रय चांदगुडे, महादेव नांदगुडे आदींचा समावेश होता.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 7,141













