“दीपावली पाडव्याच्या दिवशी यशवंतराय यात्रेचा प्रारंभ ; “पालखी सोहळा, कुस्त्या, तमाश्याने गावाला येणार रंगत”!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२० : म्हसोबावाडीत यशवंतरायाची पारंपरिक यात्रेस होणार उत्साहात सुरुवात ; सोनगाव संगमातील पाण्याने होणार जलाअभिषेक…..भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, पालखी सोहळा, भाकणूक, कुस्त्यांचा थरार आणि लोकनाट्याने रंगणार धार्मिक जल्लोष……
पुणे जिल्ह्यातील म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे ग्रामदैवत यशवंतरायाची पारंपरिक यात्रा यावर्षी दीपावली पाडव्याच्या दिवशी, म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी, भक्तीभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी, पारंपरिक पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी म्हसोबावाडी गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
यात्रेची सुरुवात सोनगाव जवळील कऱ्हा–निरा नदीच्या संगमातील पवित्र पाण्याने यशवंतरायाचा जलाभिषेक करून होईल. पहाटे अभिषेकानंतर सकाळी दहा वाजता देवाच्या पारंपरिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दुपारी दोन वाजता मुळगावातील यशवंतराय मंदिरातून चांदीची पालखीत देवाचे चांदीच्या मुखवट्यासह सनई–चौघड्यांच्या गजरात ओढातीरावर असलेल्या स्वयंभू पाषाणरूप यशवंतरायाच्या मंदिराकडे मार्गस्थ होईल. पालखी सोहळ्यात पितळी ढोल, झांज, लेझीम, सासनकाठ्या आणि छत्री अब्दागिरीसह हजारो भक्तांचा उत्साही सहभाग असणार आहे.
या सोहळ्यात पालखीचा मान नांदगुडे कुटुंबीयांना, तर, सासनकाठीचा मान कवडे, दाभाडे, झेंडे, पवार, साळुंखे, थोरवे,राऊत आणि सुर्यवंशी, छत्री अब्दागिरीचा मान मोरे व तावरे, ढोलाचा मान चांदगुडे कुटुंबीयांना, तर संभळाचा मान भोसले, तर सनईचा मान खंडाळे कुटुंबीयांना आहे. या पारंपरिक मानपानामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.
हनुमान मंदिराच्या तळावर पालखी विसावेल, जिथे भक्तांकडून पारंपरिक गजीनृत्याचे प्रात्यक्षिक सादर होईल. त्यानंतर पालखी यशवंतरायाच्या नावानं चांगभलच्या गजरात कालिका माता मंदिरासमोरील तळावर पोहोचेल आणि संध्याकाळी धार्मिक विधी पार पडतील.
२३ ऑक्टोबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस साजरा होणार असून दिवसभर धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडतील. यामध्ये यशवंतरायाच्या भाकणुकीचा कार्यक्रम, निलेश कुमार आहिरेकर सह रूपाली पुणेकर या नामांकित लोकनाट्य तमाशा मंडळाचा प्रयोग आणि जंगी कुस्त्यांचा आखाडा यांचा समावेश आहे. रात्री दहा वाजता पालखी मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होईल, तर परतीच्या प्रवासात कालिका माता तळावर रात्रभर धार्मिक कार्यक्रम पार पडतील.
२४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता पालखी लक्ष्मी माता मंदिर तळावर पोहोचेल, जिथे धार्मिक विधी पार पडतील. सकाळी दहा वाजता पालखी गावच्या मुख्य मंदिरात आगमन करून दुपारी चारच्या सुमारास देवाची प्रतिष्ठापना होईल आणि यात्रेची सांगता केली जाईल.
यात्रेदरम्यान पाडव्यादिवशी दुपारी ४ वाजता देवासमोरील पटांगणात भक्तांकडून नवसाची बकरी कापण्यात येणार आहेत. तसेच यात्रेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा कमिटीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही भक्तांची गैरसोय होत नाही, असे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दरवर्षी या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे या यात्रेचा आवाका आणि लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे यात्रा कमिटीने नमूद केले आहे.
या पारंपरिक सोहळ्यामुळे म्हसोबाचीवाडी गाव भक्तिभाव, संगीत आणि आनंदाने भारून जाणार असून, यामुळे परिसरात उत्सवाचा जल्लोष साजरा होणार आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!