इंदापूर, ता.५ : इंदापूर तालुक्यातील निरगुडे, लाकडी, शिंदेवाडी आणि काझड या परिसरातील शिवरस्ता आता अखेर खुला झाला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादविवादांना बाजूला ठेवून ग्रामस्थांनी सलोख्याने एकत्र येत रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी रायचंद सर, पप्पू कोळेकर, दत्तू कोळेकर, गहीनाथ गुरुजी, गणेश वनवे, सचिन वनवे आणि आप्पा वनवे या शेतकऱ्यांनी स्वखुशीने आपली जमीन देऊन एक समाजहिताचा आदर्श निर्माण केला आहे.
या रस्त्याच्या बांधकामासाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता विजय बबनराव काळे यांनी स्वतःचे मशीन आणि रोड रोलर उपलब्ध करून दिला. सुमारे ३ किलोमीटर लांबीचा हा रस्ता स्वखर्चाने बनविण्यात येणार असून, या कामाचा एकूण अंदाजे खर्च १० लाख रुपये इतका येणार आहे. चिरंजीव सत्यजित विजय काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला, हे विशेष.
या उपक्रमाचे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी केले. ग्रामस्थांनी स्वतःच्या श्रमातून आणि समन्वयातून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शिवरस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमाचे उद्घाटन इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी विजय बबनराव काळे आणि सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी घेतली आहे.
या कार्यात कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांचाही मोलाचा वाटा असून, त्यांच्या प्रोत्साहनामुळे ग्रामस्थांना एकत्र आणण्यात यश आले. ग्रामस्थांच्या सहकारातून आणि स्वखर्चातून उभा राहिलेला हा शिवरस्ता केवळ संपर्काचा मार्ग नसून, एकात्मतेचा आणि विकासाच्या इच्छेचा प्रतीक ठरला आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार असून, विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना ये-जा करणे सुलभ होणार आहे. ग्रामविकासाचे खरे चित्र म्हणजे शासनाच्या निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेला हा उपक्रमच होय.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 304











