जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :- पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार हे पक्ष जास्तीत जास्त जागा लढवत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे हे पक्ष सर्वांत कमी, तर काँग्रेस प्रामुख्याने त्यांच्या आसणाऱ्या बालेकिल्ल्यांत लढत असल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या वेळी शहरी आणि ग्रामीण हा फरक प्रकर्षाने यावेळी दिसून आला.
महाविकास आघाडीच्या वतीने शरदचंद्र पवार यांनी संपूर्ण पुणे जिल्हा ढवळून काढला. विशेष म्हणजे जेथे अजित पवारांचे उमेदवार आहेत, तेथे त्यांनी साखर कारखाने, शेती आदी स्थानिक मुद्दे केंद्रस्थानी ठेवले होते. मात्र, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे शहर-जिल्ह्यात उमेदवार असूनही न फिरकणे अनाकलनीय ठरले. काँग्रेसने सर्व भर हा महायुतीचे विकासाचे मुद्दे खोडून काढण्यावर ठेवला होता. त्यासाठी त्यांची राष्ट्रीय प्रवक्त्यांची कुमक ही पुणे शहरात पाठविण्यात आली होती.
अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेत त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच पुण्याचा विकास, मेट्रो, उच्च वर्तुळाकार मार्ग, प्राप्तिकरातील सवलत अशा खास मध्यमवर्गीय मुद्द्यांना हात घालून त्याला आपल्या भाषणात आवर्जून स्थान दिल्याचे दिसले. नितीन गडकरींनीही विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणावर आरोप केले, तर देवेंद्र फडणवीसांनी विशेषत: कसब्यात ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगेवर भर दिल्याचे जाणवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात एका जागेवर सुद्धा उमेदवार नसताना सभा घेणे, तसेच अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या हडपसर आणि वडगावशेरी येथील उमेदवारांसाठी जोर लावणे यातून महायुतीने नियोजनपूर्वक प्रचार केल्याचे यावेळी दिसून आले.
विदर्भ आणि मराठवाड्यात फटका बसण्याच्या धास्तीने एकीकडे महायुतीने पुणे व पश्चिम महाराष्ट्रात ती कसर भरून काढण्यासाठी व्यूहरचनात्मक पद्धतीने प्रचार केला, तसेच महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेले यश टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिक्रियावादी प्रचार न करता, सद्या सरकारचे काय चुकते आहे आणि त्यावर आमचे उपाय काय, हे दाखवून देण्यावर भर दिल्याचे यावेळी दिसले.
यामध्ये प्रमुख नेत्यांच्या लढती पुढील प्रमाणे आहेत
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार (बारामती), ● रोहित पवार विरुद्ध राम शिंदे (कर्जत जामखेड), ● रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासणे (कसबा), ● हर्षवर्धन पाटील वि. दत्तात्रय भरणे वि. प्रवीण माने (इंदापूर), ● रोहित पाटील वि. संजयकाका पाटील (तासगाव), ● महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे (कोरेगाव), ● पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले (कराड दक्षिण), ● सुधीर गाडगीळ वि. जयश्री पाटील विरूद्ध पृथ्वीराज पाटील (सांगली), ● राजेश लाटकर वि. राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर)
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह