जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूरः (दि.२४) इंदापूर तालुक्यातील दळणवळण सुखकर तसेच ग्रामीण भाग शहरी भागाला जोडला जावा म्हणून उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांच्या नेतृत्वाखाली इंदापूरचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सन 2023- 2024 या साला मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शेटफळगडे – म्हसोबाचीवाडी -लाकडी – निंबोडी – काझड बोरी – लासुर्णे या रस्त्यांसाठी 5 कोटी 26 लाख 62 हजार 530 रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आणि या कामाची टेंडर प्रक्रिया सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आली आणि या रस्त्याचे काम दोन कंपन्यांना देण्यात आले , शेटफळगडे ते म्हसोबाचीवाडी या रस्त्याचे काम टेंडर प्रक्रियेतून एनपी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. आणि म्हसोबाचीवाडी ते लासुर्णे रस्त्याचे काम अमित कंट्रक्शन या कंपनीला देण्यात आले.
या दोन्ही कंपन्यांनी सदरील रस्त्यांची कामे चालू केली परंतु बऱ्याच ठिकाणची कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे यामध्ये पुलांची कामे , साईड पट्ट्या आणि काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला विहीर असताना ही संरक्षक कठडे बांधण्यात आले नाहीत तसेच शेटफळगडे ते म्हसोबाचीवाडी या रस्त्यावरील कवडेवस्ती या ठिकाणी अर्धा किलोमीटरचा कार्पेटचा लियर अपुर्ण ठेवण्यात आला आहे तसेच म्हसोबाचीवाडी गावठाण मधील लक्ष्मीमाता मंदिर ते चांदगुडे वस्ती या रस्त्याचे तीनशे मीटरचे संपूर्ण कामही अपूर्णच ठेवण्यात आले आहे . सदरचा रस्ता पूर्वी सुस्थितीत होता व त्याचे डांबरीकरण होते परंतु संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने तो उखाडलामुळं गेल्या वर्षी पावसाळ्यात या रस्त्याची दुरावस्था अत्यंत दयनीय झाली होती , तो रस्ता चिखलमय झाला होता त्यामुळे या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती. आता पुन्हा दुसरा पावसाळा आला परंतु या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे अपूर्ण राहिली आहेत.
हा रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग पुणे व एनपी इन्फ्रा प्राइवेट लिमिटेड आणि अमित कंट्रक्शन या कंपन्यांची असून सुद्धा ही कामं पुर्ण करता आली नाहीत म्हणून यांना जबाबदार धरून या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी आता येथील नागरिक करत आहेत.
या रस्त्याचे काम पूर्ण व्हावी म्हणून गेल्या नऊ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री मधुकरराव सुर्वे आणि एनपी इन्फ्रा कंपनीचे अधिकारी बनसोडे यांच्याशी वेळोवेळी फोनव्दारे संपर्क साधण्यात आला असता त्यांच्याकडून फक्त आज करतो आणि उद्या करतो अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत होती परंतु अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही तसेच या रस्त्याचे काम अपूर्ण असताना ही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मिलीभगत मुळे या रस्त्यांची कोट्यावधींची बिले मात्र नचुकता 31 मार्चच्याच आतमध्ये अदा करण्यात आली आहेत.
एकीकडे दळणवळण चांगल्या प्रकारे व्हावे म्हणून राज्य सरकारकडून कोट्यावधींचा खर्च करून नवीन रस्त्यांची निर्मिती करत आहे त्यामुळे ग्रामीण भाग हा शहरी भागाला जोडण्यास मदत होत आहे.परंतू रस्ते बांधकाम अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या साटेलोटे व अर्थपूर्ण देवाणघेवाणीमुळे सदरील रस्त्यांची कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे राज्यसरकार अशा अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर काय कारवाई करणार की , हे कुरण चरण्यासाठी असेच त्यांना मोकाट सोडणार ? अशा संतप्त स्वरूपातील प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटत आहेत.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामातील हलगर्जीपणा मुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून बदल्या केलेल्या आहेत. त्यामुळे शेटफळगडे – लासुर्णे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेशी संबंधित अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांचेवर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
….

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 334