जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती :- (दि.२२)उपमुख्यमंत्रीअजित पवारांच्या नेतृत्वाखालील माळेगाव, सोमेश्वर व छत्रपती या कारखान्यांच्या प्रशासनाकडून मागील झालेल्या ऊसाच्या गळीत हंगामाला पहिला हप्ता म्हणून २८०० रुपये सरसकट देण्यात आला. माळेगावच्या कारखान्याला सुमारे एक लाख मेट्रिक टन गेटकेन ऊस मिळालाच नाही. गेटकेन ऊस संपल्यानंतर याच माळेगाव कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी ३१३२ रुपये प्रतिटन दर सभासदांना देऊ केले.
या चुकीच्या धोरणांमुळं माळेगाव कारखान्याचं आणि पर्यायानं सभासदांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही सडेतोडपणाने पुढे मांडतच राहणार आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळणार नसेल, तर आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर तोडजोड कशासाठी करायची. यामुळे कारखान्याचे चेअरमन होण्यास काय अर्थ आहे, अशा कडक शब्दांमध्ये विरोधी गटाचे प्रमुख ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी माळेगाव कारखान्याच्या होणाऱ्या निवडणूकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकांचे बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आल्याचे आज स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा बारामतीत घेतला आणि त्यांनी हि निवडणूक राष्ट्रवादी पक्षाच्या स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून लढवण्याचा आपला विचार जाहीर केला. त्यानंतर लागलीच अजित पवार यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी या निवडणुकीला मोठ्या आत्मविश्वासानं सामोरे जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत आपले मत स्पष्ट केले आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, माळेगावच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होत असताना नीरा नदीच्या प्रदुषित होत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त उपमुख्यमंत्री अजित पवार का करू शकले नाहीत, असाही सवाल चंदरराव तावरे यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, ”मागील निवडणूकीत मते मागताना त्यांनी नीरा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न सोडविणार म्हणून मते घेवून सत्तेत आले. गेली पाच वर्षात अद्याप हा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार राहिला नाही.
कारखाना निवडणूक प्रचार शुभारंभाच्या सभेत कारखान्याच्या चेअरमनच नाव जाहीर करणार असे अजित पवार यांनी सांगितले, असे विचारले असता चंदरराव तावरे म्हणाले,लोकशाही मध्ये असे चालते का? निवडणूक होण्याअगोदरच चेअरमन चे नाव जाहीर करणे म्हणजे सुमारे २० हजार सभासदांना किती विश्वासात घेतले हे यामधून स्पष्ट होते. तुम्ही बारामती तालुक्याचा विकास केला म्हणता, तर रस्ते, दिवाबत्ती, पाण्याच्या सुविधा करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आद्य कर्तव्यच आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 922