“लाचखोरीचा कहर; ७/१२ साठी नागरिकांना हेलपाटे!” — खेड शिवापूर प्रकरणी कडक कारवाईची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बुलंद आवाज जनतेचा
हवेली, ता.११: हवेली तालुक्यातील खेड शिवापूर परिसरातील मंडल अधिकारी व तलाठी यांच्या मनमानी आणि कथित लाचखोरीविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रशक्ती संघटनेतर्फे पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत यांना निवेदन देण्यात आले.
नागरिकांची महसुली कामे सुलभ व वेळेत निकाली काढणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना ७/१२ नोंदीसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. “अनाकलनीय व गैरलागू नियमांचे कारण देत” कामे मुद्दाम अडकवली जात असून, त्यामागे आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः सातारा रस्ता परिसरातील हवेली व भोर तालुक्यातील काही मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडून सर्रास लाच मागितली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जमिनींच्या वाढलेल्या किमतींचा आधार घेत “जमिनीच्या किमतीनुसार लाचेची मागणी” केली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वरिष्ठ महसुली न्यायालयाच्या आदेशानंतरही ७/१२ नोंदी करताना लाच न दिल्यास आदेशात त्रुटी शोधण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महसुली कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करून भ्रष्टाचाराचे मार्ग कायमचे बंद करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच महसुली न्यायालयातील आशिलांचे संघटन उभारून या विरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
वरिष्ठ अधिकारी लोकाभिमुख पद्धतीने काम करत असताना काही भ्रष्ट अधिकारी संपूर्ण महसुल विभागाची प्रतिमा मलिन करत असल्याने महसुल मंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी राष्ट्रशक्ती संघटनेचे शहाजी आरसुळ, राजगड विकास परिषदेचे ॲड. नितीन दसवडकर व रामदास मांढरे उपस्थित होते. राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माउली दारवटकर यांनी या प्रकरणी कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!