जनसंघर्ष न्युज नेटवर्क
बारामती, ता.२६ शासकीय सेवेत नसताना शासकीय शिक्क्याचा वापर करून वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी बारामती येथील गावडे हॉस्पिटलचे डॉ. पांडूरंग गावडे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ मधील कलम १३ तसेच भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ४१९ व ४२० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते सतीश गावडे व धनाजी गावडे यांच्यात वाद झाल्यानंतर धनाजी गावडे यांना १ एप्रिल २०१९ रोजी जखमी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले होते. या प्रमाणपत्रावर ‘मेडिकल ऑफिसर, सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल’ असा शिक्का डॉ. पांडूरंग गावडे यांच्या नावासह मारण्यात आला होता.
दरम्यान, सतीश गावडे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे तसेच संबंधित रुग्णालयाकडे डॉ. गावडे यांच्या सेवाकालाबाबत माहिती मागवली. त्यातून प्रमाणपत्र देण्यात आलेल्या कालावधीत डॉ. गावडे संबंधित रुग्णालयात कार्यरत नसल्याचे उघड झाले.
या प्रकरणाची दखल घेत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने १६ जून २०२५ रोजी बारामती शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई न झाल्याने फिर्यादी यांनी सदरील प्रकरण मीडियामध्ये दिल्याने व ३० जुलै २०२५ रोजी पुन्हा पाठपुरावा करण्यात आला.
त्यानंतर बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे यांनी वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर बारामती शहर पोलीस प्रशासन यांच्याकडे अखेर २० मार्च २०२६ रोजी डॉ. महेश जगताप यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलिसांकडून सुरू असून, संबंधित प्रकारामुळे शासकीय शिक्क्यांच्या गैर वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 95,097









