जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
पुणे, ता.३:- पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आधारकार्ड संदर्भातील गंभीर अडचणींचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे. अनेक व्यक्तींचे सुरुवातीला काढलेले आधार क्रमांक अचानक बंद झाले असून काहींचे अपडेट प्रक्रिया दीर्घकाळ अडकून पडली आहे. दरम्यान, शासकीय कामकाजाच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर आधार अनिवार्य असल्यानं सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधार हे असुन अडचण अनं नसुन खोळंबा अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. त्याला कारण यामधील जाचक अटी…
या जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील वयस्कर नागरिकांची अडचण यामध्ये अधिकच वाढली आहे. त्यांच्याकडे जन्मदाखला, शाळेचा दाखला किंवा इतर आवश्यक ओळखपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांचे आधार अपडेट होऊ शकत नाही. सरकारी रुग्णालयांतून मिळणाऱ्या अंदाजे वयाच्या प्रमाणपत्रांवरही आधार केंद्रांकडून नकार दिला जात असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यामुळे रेशनिंग कार्ड तयार करणे, बँक खाते उघडणे, मृत्यू नोंदणी, वारसनोंदी, तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ घेणे— या सर्व प्राथमिक सेवांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. गावातील अनेक कुटुंबांची आर्थिक व सामाजिक कामे आधार अडकल्याामुळे ठप्प झाली आहेत.
या समस्येमुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वृद्ध नागरिकांना आधारसाठी सातत्याने फेऱ्या माराव्या लागत आहेत; परंतु दस्तऐवजांचा अभाव आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रक्रिया पूर्ण होत नाही.
“आधारशिवाय कोणतीही सरकारी सेवा उपलब्ध होत नाही, मग आमच्यासारख्या कागदपत्र नसलेल्या व्यक्तीने काय करावे?” असा प्रश्न ग्रामस्थांकडून शासकीय यंत्रणेला उपस्थित केला जात आहे. वृद्धांचा आधार अडकला ; जन्मप्रमाणपत्राच्या बंधनात आसे म्हणण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे.
आधार संदर्भातील या अडचणींबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून काही विशेष उपाययोजना राबवल्या जाणार आहेत का, याबाबतची अदयापर्यंत स्पष्टता मिळालेली नाही. तांत्रिक बिघाड, जुने दस्तऐवज नसणे आणि नियमांची कठोरता— या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या मूलभूत सेवा सुविधा मिळण्यात होत असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.
सध्या तरी आधार केंद्रांवर मोठी गर्दी दिसत असून नागरिकांना योग्य मार्गदर्शन तसेच विशेष शिबिरे आयोजित करण्याची मागणीही जोर धरते आहे. या समस्या सुटण्यासाठी सरकारची पुढील पावले काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 30,172










