जनसंघर्ष न्युज नेटवर्क
पुणे, ता.३०:- डॉ. गौरी प्रकरणानंतर राज्य हादरले असतानाचं ; आता पुण्यातील डॉ. स्नेहल घुगे यांचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे, डॉ. गौरी गर्जे–पालवे यांच्या संशयास्पद आत्महत्येनं राज्यभरात अजूनही खळबळ शांत झालेली नाही. पतीचे कथित अफेअर आणि सासरच्या छळाला कंटाळून त्यांनी जीव दिल्याचा आरोप समोर आला, त्याच वातावरणात आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
पुण्यातील डॉक्टर स्नेहल घुगे यांनी थेट कॅमेऱ्यासमोर “डॉ. गौरीनंतर माझा बळी जाणार!” असा खळबळजनक आरोप करत आपबीती सांगितली आहे.
नेमकं काय आहे घुगे प्रकरण?
डॉ. स्नेहल घुगे या विवाहित डॉक्टर महिलेने साडे तीन वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा केला आहे.
त्याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये भाजप आमदार नारायण कुचे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नावांचा उल्लेख करत गंभीर आरोप लावले आहेत.
स्नेहल घुगे व रविंद्र महादेव घुगे यांचे साडे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र लग्नानंतर पतीचे दोन मुलींशी अफेअर असल्याचे उघड झाल्यानंतर जेव्हा त्यांनी प्रश्न विचारले, तेव्हा त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
गेल्या अकरा महिन्यांपासून पती घर सोडून गायब आहे, घटस्फोट हवा म्हणून मुद्दाम फरार असल्याचाही आरोप त्यांनी केला.
राजकीय नातेवाईकांकडून छळ? नावात धमकी?
स्नेहल घुगेंच्या मते, त्यांची नणंद योगिता सानप यांच्याकडूनही सतत छळ होत आहे. ही योगिता सानप म्हणजे आमदार नारायण कुचे यांची कार्यकर्ती, असा त्यांचा दावा.
“कुचे साहेबांचं नाव घेत आम्ही पाच–दहा लाख टाकले, तर तुझ्यावर केलेली कोणतीही केस आम्ही बाहेर काढू,” अशा उघड धमक्या दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
पोलीसही मूक? संरक्षण नाही, उलट दमबाजी?
स्नेहल घुगेंचा आरोप आणखी गंभीर आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार—पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली असून,
“आम्ही संरक्षण देणार नाही, तक्रारही घेणार नाही. लोकांच्या घरात घुसलीस तर मार खायला तयार राहा!”
असं उत्तर त्यांना पोलिसांकडून देण्यात आलं. त्याचबरोबर पोलिसांसमोरच त्यांच्यावर हल्ला झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनीही मदत केली नाही?
या सगळ्या परिस्थितीत त्यांनी मदतीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे धाव घेतली.
मात्र व्हिडिओनुसार, नारायण कुचे यांचे नाव असल्याने चित्रा वाघ यांनी मदत करण्यास टाळाटाळ केली. उलट ‘घटस्फोट घेऊन या चक्रातून बाहेर पडा’ असा सल्ला दिला,” असं डॉ. स्नेहल घुगे म्हणतात.
“मी आत्महत्या करणार नाही; माझा खून होऊ शकतो!” — घुगे डॉ. स्नेहल घुगे यांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं—
“मी आत्महत्या करणार नाही. माझा फक्त खून होऊ शकतो. आणि तो आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याला माझी सासरची मंडळी आणि संबंधित लोक हेच जबाबदार असतील.”
आमदार कुचे यांचे उत्तर
दरम्यान, आमदार नारायण कुचे यांनी सर्व आरोप फेटाळला आहे.
“मी त्या महिलेला किंवा तिच्या पतीला ओळखतही नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
ही संपूर्ण घटना आता राज्यभरात नव्या चर्चांना तोंड फोडत आहे. डॉ. गौरी प्रकरणाने पेटलेला आक्रोश अजून शांत झाला नसतानाच, डॉ. स्नेहल घुगे यांचा हा थरारक व्हिडिओ प्रशासन, राजकारण आणि कायदा-सुव्यवस्था यांच्याच भूमिकेवर प्रश्नांची झोड उठवतो आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 21,331










