जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२६:- इंदापूर तालुक्यातील निरगुडे ते वाकडेवस्ती या मुख्य रस्त्यावर तब्बल ११ केव्ही विद्युत लाईनचे सुमारे ४० खांब आणि त्यांचे तान थेट रस्त्याच्या साइट पट्ट्यात रोवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आधीच अरुंद असलेला रस्ता आता या विद्युत खांबांमुळे धोकादायक बनला असून अपघाताचा गंभीर धोका कायम झाला आहे. याचबरोबर पुढील काळात रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले तर हे सर्व खांब पुन्हा हलवावे लागणार असल्याने जनतेच्या पैशाचा सरळसरळ अपव्यय होत असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी केला आहे.
खारतोडे पुढे म्हणाले की, ‘‘पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटकडून स्पष्ट पत्र असून त्यामध्ये रस्त्याच्या मध्यबिंदूपासून १५ मीटर अंतरावरच विद्युत खांब असावेत असे नमूद करण्यात आले आहे. तरीही या निर्देशांचे थाटात उल्लंघन करून उर्जाभवन विभागाने खांब अक्षरशः रस्त्याच्या कडेला रोवले आहेत. हा निष्काळजीपणा नाही तर जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे.’’
या प्रकरणावर कार्यकारी अभियंता, उर्जाभवन बारामती यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी दिलेल्या उत्तराने अधिकचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘‘राज्यात बऱ्याच ठिकाणी विद्युत लाईन रस्त्याच्या कडेला असते,’’ असे सांगून त्यांनी विषय झाकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना PWD च्या स्पष्ट पत्राची माहिती देण्यात आली, तेव्हा त्यांनी ‘‘आम्ही आणि PWD चे अधिकारी आमचे आम्ही पाहून घेऊ,’’ असे उत्तर देत जबाबदारी झटकली.
यामुळेच खारतोडेंनी पुढे गंभीर आरोप करत विचारणा केली की, ही लाईन खरोखर वाकडेवस्तीसाठीच आहे का? की वाकडेवस्तीच्या नावाखाली तेथे असणाऱ्या खासगी खडीक्रेशर मशीनसाठी ही लाईन खास वळवण्यात आली आहे? त्यांनी पुढे आणखी धक्कादायक प्रश्न उचलला—
‘‘कार्यकारी अभियंता आणि खडीक्रशर मालक यांच्यात या लाईनसाठी अर्थपूर्ण देवानघेवान तर झाली नाही ना? जनतेचे हक्काचे पैसे कोणाच्या खाजगी फायद्यासाठी वळवले जात आहेत का?’’
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये या संपूर्ण प्रकरणामुळे प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेने उभे असलेले खांब वाहतुकीला अडथळा निर्माण करत असून नागरिकांना ये-जा करताना धडकी भरत आहे. ‘‘एवढ्या मोठ्या प्रमाणावर खांब उभे राहतात आणि PWD च्या परवानगीचे पालन होत नाही, हे कसे? कोणत्या आदेशावर? कोणाच्या सांगण्यावर?’’ असे प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा खेळ सुरू असताना लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र अधिकच गंभीर रूप धारण करत आहे. प्रशासनाचे दोन विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असताना जनता मात्र धोका पत्करून या रस्त्यावरून प्रवास करत आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, चुकीच्या ठिकाणी रोवलेले सर्व खांब त्वरित हटवून PWD च्या नियमांनुसार योग्य ठिकाणी लाईन उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत असून प्रकरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 20,290










