जनसंघर्ष न्यूज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
बारामती, ता.६ : रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा : अपघातग्रस्त बायडाबाई खोमणे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तत्परतेनं दिले नवे जीवनदान! – “रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या भावनेला साजेशी घटना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. पिंपळी लिमिटेक (ता. बारामती) येथील सौ. बायडाबाई अंकुश खोमणे (वय ६२ वर्षे) यांना अलीकडे झालेल्या भीषण अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (आरोग्य मंदिर, रचना मार्केट, मारवाड पेठ) येथे संपर्क साधला.
सरपंच नामदेव मेरगळांकडून सतिश गावडेंचा सत्कार
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक श्री सतीश गावडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णाला डॉ. पी. एन. देवकाते (देवकाते हॉस्पिटल, बारामती) यांच्या दवाखान्यात दाखल केले. डॉ. देवकाते यांनी तपासणी करून तातडीने पुण्यातील प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. सचिन पाटील यांना बोलावले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
या मानवी सेवेतील योगदानाबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉ. पी. एन. देवकाते, डॉ. सचिन पाटील व त्यांच्या स्टाफचे मनःपूर्वक आभार मानले. शिवाय, सतीश गावडे यांनी वैद्यकीय बिलामध्ये तब्बल ४०,००० रुपयांची सवलत मिळवून देत आर्थिक मदतीचा हातही दिला.
या कार्यामागे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर, श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी व शिक्षक मतदारसंघाचे भावी आमदार श्री मंगेश चिवटे यांच्या प्रेरणेचा उल्लेख करण्यात आला.
पेशंट बरी होऊन घरी परतल्यावर, पिंपळी लिमिटेक येथील सरपंच श्री नामदेव मेरगळ यांच्या हस्ते सतीश गावडे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री कांबळे यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की —
रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे!
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 1,047











