जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, ता.३० : अतिवृष्टीचा कहर आणि त्यातून उद्भवलेला ओला दुष्काळ — हे नवे नाही. ३० सप्टेंबर २०२१ रोजीच्या झालेल्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारो एकर शेती पाण्याखाली गेली होती. शेतकरी त्याचं दुःख अजून विसरला नाही, तोपर्यंत पुन्हा एकदा असंच संकट उन्हाळ्यातील अवकाळीने व सष्टेंबर मध्ये झालेल्या पावसाने कोसळलं आहे. पिकं, वाहून गेली, शेत उद्ध्वस्त झाले, जनावरांचा चारा संपला, घरं- दार पाण्यात गटांगळ्या खात होती. तर, जनावरं मेली शेतकरी पुन्हा कोलमडला. पण सरकारचं काय धोरण? तर नुसतीच डोळेझाक आण नुसतीच ढकलाढकली!
शेतकऱ्याची अवस्था आज एवढी बिकट आहे की, प्रत्येक शेतजमिनीवर कर्जाचं ओझं आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, पोटाची भूक आहे. त्यावरून पिकंही नष्ट झाली. पण शासन मात्र केवळ पंचनामे चालू आहेत, लवकरच मदत मिळेल या जुजबी शब्दांत जबाबदारी टाळतंय. खरंतर हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे.
नेत्यांचे आणि अधिकार्यांचे पाहणी दौरे म्हणजे विनोदच झाला आहे. गाड्यांचे ताफे, हेलिकॉप्टरमधून केलेल्या हवाई पाहण्या, पत्रकारांसमोरचे दिखाऊ अश्रू — एवढंच होतं. आणि नंतर पुन्हा शांतता! शेतकऱ्याच्या घामाने निर्माण झालेल्या पिकांच्या खांद्यावर सरकार फक्त फोटो काढण्याइतकंच ओझं टाकतं. हा सरळसरळ फसवणुकीचा खेळ आहे.
शेतकऱ्याची एकच मागणी आहे – ‘ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा’. पण शासन इतकं गुंग झालं आहे की, शेतकरी बुडाला तरी त्यांना फरक नाही. पोटाची आग, जनावरांचा चारा, शेताची पुन्हा उभी करायची वेळ – या गोष्टी सरकारच्या टेबलावरील आकडेवारीत बसत नाहीत. कारण या सरकारला शेतकऱ्याचा जीव नव्हे, तर आकडेवारीची जोपासना महत्वाची आहे.
युद्धपातळीवर निर्णय घेण्याऐवजी शासनाची पावलं नेहमी कासवाच्या गतीने पडतात. उन्हाळ्यातील झालेल्या अतिवृष्टीची भरपाई अजून शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेली नाही, आणि सष्टेंबर २०२५ मध्ये पुन्हा तेच संकट. शेतकरी मरत राहिला तरी सरकारचं मन मरत नाही.
शेतकऱ्याचं जगणं आज हवालदिल झालंय. घर, शेती, जनावरं, उदरनिर्वाह – सर्व काही या ओल्या दुष्काळाने संपूर्ण गिळलंय. तरीही सरकारकडून ठोस कारवाई नाही. एकीकडे कर्जमाफीच्या फसव्या घोषणा, दुसरीकडे नुकसान भरपाईचे हवेतील आश्वासनं. प्रत्यक्षात मात्र शेतकरी उभा आहे तो उघड्यावर – निसर्गाच्या कोपाने झोडपलेला आणि सरकारच्या विश्वासघाताने उध्वस्त झालेला.
शेतकऱ्याचा उद्रेक आता थांबणार नाही. या अस्मानी संकटाला सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी जोडली गेली तर त्याचे परिणाम केवळ शेतीवर नाहीत, तर संपूर्ण समाजावर होणार आहेत. सरकारने ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत केली नाही, तर शेतकऱ्याच्या उभ्या हंबरड्याने सत्तेच्या खुर्चीला हादरे बसले तर आश्चर्य वाटू नये.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 988










