“हायवाचा कहर” : जीव गेला तरच प्रशासन जागं होणार का?” संतप्त नागरिकांचा सवाल.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, ता. ३० : बारामती शहरात नुकत्याच झालेल्या अपघातात भरधाव हायवाने एका इसमाचा बळी घेतला व शाळेच्या व्हॅनला फरफटत नेल्याची भीषण घटना अजूनही ताजी असतानाच, इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावाच्या मध्यवस्तीतून धावणाऱ्या हायवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खडी वाहतुकीसाठी येणाऱ्या या गाड्या निष्काळजीपणे वेगाने धावत असून नागरिकांच्या जीवाला रोज नवा धोका निर्माण झाला आहे.
गावाच्या मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या या हायवांचा वेग एवढा भरधाव असतो की महिलांना, शालेय मुलांना व वृद्धांना सुरक्षितपणे चालणे कठीण झाले आहे. व्यापारी वर्गही त्रस्त असून दुकानांपुढे ग्राहक थांबण्यास घाबरतात. धुळीच्या ढगामुळे वस्तूंचे नुकसान होते आणि दुपारी ग्राहकांना गावातील रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे ठरते.
“प्रशासन नेमके काय करत आहे? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच हा बेजबाबदारपणा थांबणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. अपघात झाल्यानंतर काही दिवस पोलीस किंवा प्रशासन तपासणी करतं; मात्र लवकरच पुन्हा ‘हायवा दहशतवाद’ सुरू होतो, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यामुळे शालेय मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांना दररोज चिंता वाटते. शिक्षक व मुख्याध्यापक यांनीही मुलांच्या प्रवासावर मोठा धोका असल्याचे सांगितले आहे. रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या नागरिकांचे प्राण ‘देवाच्या भरोशावर’ ठेवावे लागतात, अशी भीषण वेळ आली आहे.
या वाहतुकीमुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि खोकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आरोग्यावर होणाऱ्या या परिणामांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप अधिकच उसळला आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेक वेळा निवेदने दिली, बैठका घेतल्या; मात्र प्रशासनाकडून फक्त तात्पुरत्या उपाययोजना झाल्या. आता मात्र “जर तातडीने पर्यायी मार्ग तयार करून हायवांची वाहतूक थांबवली नाही, तर रस्ता रोको,  यासारखे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. जबाबदार यंत्रणा मौन बाळगून असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. हायवांचा कहर असाच सुरू राहिला तर नागरिक रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करतील, अशी स्पष्ट चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने वेळीच गंभीर दखल घेणे अत्यावश्यक झाले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!