जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.१५ : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी परिसरात सलग झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून थोरवे वस्ती येथील सुनिल थोरवे यांच्या घराला अक्षरशः पाण्याचा वेढा बसला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये म्हसोबावाडी ते दाभाडे वस्ती, थोरवे वस्ती या मार्गाचा रस्ता तयार करण्यात आला होता. ठेकेदार एच. पी. पांढरे यांनी हे काम पूर्ण केले असले तरी त्यावेळी केलेल्या अर्धवट नियोजनाचा फटका आज नागरिकांना बसतो आहे.
रस्ता बांधताना सुनिल थोरवे यांच्या घरासमोरील ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी फक्त एक सिमेंटची पाईप टाकण्यात आली. त्या एका नळीतून वेताळाचा माळ, ढमाळ वस्ती, खडीक्रेशर मशीन परिसरातील पाणी वाहून येते,परिणामी मुसळधार पावसाने ही नळी अपुरी पडली व पाणी साचून थेट घरामध्ये शिरन्याच्या मार्गावर आहे , त्यामुळे थोरवे कुटुंबीयांचे मोठे नुकसान होऊ शकते, आजूबाजूच्या दाभाडे वस्ती, थोरवे वस्ती, कवडे वस्ती, म्हसोबावाडी गावठाण परिसरातील नागरिकही भीतीच्या सावटाखाली दिवस काढत आहेत.
उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने या भागातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतमाल, घरगुती सामान पाण्याखाली गेले होते, तर जनावरांना देखील मोठा फटका बसला होता. तरी देखील प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत, ही बाब अधिक वेदनादायी आहे.
प्रत्यक्षात रस्ता बांधणीच्या वेळीच ठिकठिकाणी पुलांची उंची वाढवून, पुरेशा नळ्या टाकून, पाणी जाण्यासाठी गटर निर्मिती करणे अत्यावश्यक होते. परंतु केवळ कंत्राटदाराच्या सोयीसाठी आणि प्रशासनाच्या ढिसाळ देखरेखीमुळे निकृष्ट दर्जाचे काम झाले. त्याचा परिणाम गावकऱ्यांना वारंवार नैसर्गिक आपत्तीचा सामना करून भोगावा लागत आहे.
आज प्रश्न फक्त पाऊसाचा नाही, तर प्रशासनाच्या बेफिकीरीचा आहे. नागरिकांचे जीव, मालमत्ता, शेती यांचा विचार न करता झालेल्या नियोजनामुळे प्रत्येक पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण होते. आता तरी शासनाने जागे होऊन, तातडीने नळ्यांची क्षमता वाढवणे, रस्त्याच्या कडेने गटर बांधणे आणि पाण्याचा योग्य निचरा होईल अशा योजना राबवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा म्हसोबावाडी व परिसरातील ग्रामस्थांना दरवर्षी पावसाच्या हाहाकाराचे बळी ठरावे लागणार आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 359










