जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
खंडाळा, ता.१६ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. जुन्या भांडणाच्या कारणावरून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (वय ४०) हा किरकोळ जखमी झाला आहे. हल्लेखोर मात्र घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्र फिरवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी शिरवळ रेस्ट हाऊस समोरील चौकात अचानक ही घटना घडली. दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले व त्यांनी शेख याच्यावर गोळीबार केला. गोळीबार होताच बाजारपेठेत मोठी धांदली उडाली. व्यापारी व नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. गोळीबारात किरकोळ जखमी झालेल्या शेख याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी स्वतः घटनास्थळ गाठून तपासाची सूत्रे हातात घेतली. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत (फलटण अतिरिक्त चार्ज), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, फलटण पोलिस ठाण्याचे निरीक्षक बदणे आणि शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
प्राथमिक चौकशीत या हल्ल्यामागे जुन्या वादाचा सूर आढळत असून हल्लेखोरांनी नियोजनबद्ध पद्धतीने शेख याला लक्ष्य केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. या घटनेमुळे शिरवळ बाजारपेठेत भीतीचे सावट पसरले आहे.
दरम्यान, पोलिसांनी शिरवळ व परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पथकांना हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
भरदिवसा बाजारपेठेत झालेल्या गोळीबारामुळे शिरवळ परिसरात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 191










