जनसंघर्ष न्यूज नेटवर्क /
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-7588622363
बारामती ता.१४ –एम. एस. ओ. विद्यालय बारामती येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत म्हसोबावाडी गावच्या दोन्ही संघांनी आपली दमदार खेळी सादर करत पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मजल मारली आहे. येत्या २५ व २६ सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत या खेळाडूंच्या कामगिरीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात अपेक्षा पवार, अक्षरा पवार, अक्षदा पवार, साक्षी महाडिक, इशिता सूर्यवंशी, ऋतुजा पवार, दिशा चांदगुडे व श्रावणी पवार या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. तर १९ वर्षांखालील गटात समृद्धी चांदगुडे, श्रावणी चांदगुडे, तन्वी साळुंके, साक्षी साळुंखे, प्रणाली पवार, वर्षा काळे व स्नेहा जगताप यांनी प्रभावी खेळ करत संघाच्या विजयानिशी जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड निश्चित केली.
या यशामध्ये पवार अकॅडमीचे कोच किरण पवार सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती मा. अध्यक्ष संदीप पवार, माध्यमिक विद्यालय म्हसोबावाडीचे मुख्याध्यापक भोंग सर, माध्यमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश पवार, तंटामुक्ती अध्यक्ष लालासो साळुंखे व स्थानिक कार्यकर्ते संदीप कवडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी या सारख्या ग्रामीण भागातील सर्व खेळाडू मुली असून त्यांनी आपल्या मेहनतीने, संघभावनेने व चिकाटीने बारामती तालुकास्तरीय पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ग्रामीण भागातील मुली खेळाच्या मैदानावर यशस्वी होताना दिसत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. जिल्हास्तरीय स्पर्धेत या संघांनी अजून मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त करण्यात आली.
या दैदिप्यमान विजयामुळे म्हसोबावाडी गावात उत्साहाचे वातावरण असून गावकऱ्यांनी खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. येत्या २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेतही म्हसोबावाडीच्या मुली विजयी होऊन तालुक्याचा व गावाचा मान उंचावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 164










