खंडाळा, ता.६ : शिरवळ येथील रामेश्वर घाटावर निरा नदीच्या पवित्र पात्रात रविवारी गणपती विसर्जनाचा सोहळा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात सुरू झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सकाळी १० वाजता सुरुवात झाली असून, दुपारनंतर शहरातील विविध मंडळांच्या गणेशमूर्तींची भव्य मिरवणूक ढोल-ताशे, लेझीम, व डीजेच्या गजरात निघणार आहे. रात्री ८ वाजेपर्यंत विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
निरा नदीच्या पात्रात विसर्जनाची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने शिरवळ पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा, तसेच वाहतूक कोंडी टाळावी यासाठी अतिरिक्त पोलिस दल ही तैनात करण्यात आले आहे. विशेषतः घाटावर सुरक्षा आणि शिस्तीचे काटेकोर पालन केले जाणार असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी पर्यावरणपूरक विसर्जनावरही विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतर्फे नदीपात्रात निर्माल्य टाकू नये यासाठी स्वतंत्र कचरा कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, अशी ग्रामपंचायतीकडून विनंती करण्यात आली आहे. स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ग्रामपंचायत व स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी यासाठी जनजागृती मोहीम राबवली आहे.
घरगुती गणपतींच्या विसर्जनावेळी सकाळपासून रामेश्वर घाटावर भक्तांची गर्दी उसळली. श्रद्धाळू भक्तांच्या “गणपती बाप्पा मोरया, पुन्हा वर्षी लवकर या” अशा गजरात नदीपात्रात बाप्पाचे विसर्जन होताना वातावरण भावनिक बनले. दुपारी शहरातील सार्वजनिक मंडळांचे गणपती मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात व लेझीम पथकांच्या तालावर भक्तांचा उत्साह द्विगुणित होणार आहे. तरुणाईतर्फे डीजेच्या आधुनिक तालावरही बाप्पाची मिरवणूक सजली आहे.
शिरवळकरांसाठी हा दिवस म्हणजे भक्ती, परंपरा आणि आनंद यांचा संगम असतो. विसर्जनाच्या वेळी उत्साहाबरोबरच शिस्त व पर्यावरणपूरकतेची काळजी घेऊन या वर्षीचा गणेशोत्सव संपन्न करण्याचा संकल्प येथील ग्रामस्थांनी केला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 68