शिरवळ परिसरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने : जिवंत देखाव्यांची मेजवानी.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
 खंडाळा, ता.४ : शिरवळ परिसरात गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण धामधूम सुरू झाली असून, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी समाजजागृती, इतिहासाची आठवण आणि सामाजिक संदेश देणारे जिवंत देखावे सादर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांना संधी उपलब्ध होणार आहे.
पेपरमिल कामगारांच्या संघर्षाची ऐतिहासिक कहाणी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बाजारपेठ यांनी या वर्षी “शिर्के पेपरमिलचा कामगारांच्या बाजूने मिळालेला ऐतिहासिक निकाल” हा जिवंत देखावा उभारला आहे. तब्बल २१ वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांना न्याय मिळाल्याच्या या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा यांच्याकडून दिलेली ऐतिहासिक निर्णयाची कहाणी या देखाव्यातून जिवंत करण्यात आली आहे. स्थानिक जनतेला या संघर्षाची आठवण करून देत कामगारांच्या हक्कांची जपणूक कशी केली गेली हे या देखाव्यातून प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय
दिग्विजय गणेश मंडळाने “छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय” या विषयावर देखावा उभारला आहे. स्वराज्य स्थापनेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला पारदर्शक, न्यायनिष्ठ आणि प्रजासत्ताक मूल्यांचा आदर्श या देखाव्यातून सादर करण्यात आला आहे. युवकांसह सर्वच पिढीला न्याय, प्रामाणिकपणा आणि आदर्श शासनपद्धतीचे भान निर्माण करण्याचा या देखाव्याचा उद्देश आहे.

पालकांसाठी हृदयस्पर्शी संदेश
किशोर गणेश मंडळाने “पालकांनो, मोबाईल नको; मुलांना वेळ द्या” हा संदेश देणारा देखावा सादर केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पालकांनी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांना वेळ द्यावा, त्यांच्या आयुष्यातील भावनिक नातेसंबंध जपले जावेत, या उद्देशाने हा देखावा तयार करण्यात आला आहे. समाजातील सर्व पालकांसाठी विचार करायला लावणारा हा उपक्रम ठरणार आहे.

 

ऑपरेशन सिंदूर : जवानांची प्रेरणादायी कहाणी
अविष्कार गणेश मंडळाकडून ” ऑपरेशन सिंदूर” या विषयावर जिवंत देखावा सादर केला
ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताने मे २०२५ मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान व पीओकेतील नऊ दहशतवादी ठिकाणांवर केलेली यशस्वी हवाई कारवाई करून बदला घेतला.
संपूर्ण परिसर सज्ज
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिरवळ परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. आकर्षक सजावट, रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात भक्तगणांनी मंडळांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक भान, ऐतिहासिक घटनांची स्मृती आणि समकालीन समस्यांवर प्रकाश टाकणारे हे देखावे नागरिकांसाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरणार आहेत.
या जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून शिरवळ परिसरातील गणेशोत्सव फक्त मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान या देखाव्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करावी, असे आवाहन मंडळाच्या आयोजकांनी केले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai