जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
शिरवळ (ता. खंडाळा) ता.३ – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरवळ परिसरातील तसेच पोलिस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांना आजच्या आठव्या दिवशी सादर होणाऱ्या जिवंत देखाव्यांसाठी मर्यादित आवाजात साउंड सिस्टम वापरास परवानगी देण्यात आली. ही परवानगी मा. जिल्हा परिषद अध्यक्ष उदयदादा कबुले यांच्या विनंतीवरून मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात तरुणाईला मिरवणुकीदरम्यान साउंड सिस्टम वापरण्याची मोठी उत्सुकता असते. मात्र कायदेशीर नियम व मर्यादांमुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात. यावर्षी स्थानिक मंडळांनी साउंड सिस्टीमबाबत मा. जिल्हा परिषद अध्यक्ष उदयदादा कबुले यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर कबुले यांनी शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून मंडळांना मर्यादित आवाजात साउंड सिस्टीम वापराची परवानगी मिळवून दिली.
या निर्णयामुळे शिरवळ शहर व परिसरातील गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान पारंपरिक ढोल-ताशांसह, मर्यादित आवाजात साउंड सिस्टीमची जोड मिळणार असल्याने तरुणाईचा उत्साह यामुळे आणखी दुणावणार आहे. यामुळे गणेशोत्सवाची मिरवणूक अधिकच आकर्षक आणि रंगतदार होणार आहे.
दरम्यान, या परवानगीबद्दल शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नलावडे साहेब यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. तरुणांनी त्यांच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले असून, पोलिस प्रशासनाचा सहकार्यभाव समाजातील धार्मिक व सांस्कृतिक उत्सव अधिक सुरळीत करण्यास मदत करणारा ठरत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक वातावरणात उत्सव साजरा करण्याचा निर्धार येथील गणेश मंडळांनी केला असून, या निर्णयामुळे गणेशोत्सवाची शोभा आणखी वाढणार आहे, अशी अपेक्षा मंडळातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 20