जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सातारा, ता.३१ : सातारा शहर पोलिसांवर पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. जबरी चोरी आणि दरोड्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये वांछित असलेल्या लखन भोसले या कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.
शुक्रवारी संध्याकाळी सातारा पोलिसांचे पथक सोनसाखळी चोरीतील आरोपींना पकडण्यासाठी शिक्रापूर परिसरात पोहोचले. तीन आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. यावेळी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, लखन भोसले उर्फ लखन जाधव (रा. जयराम स्वामी वडगाव, ता. खटाव) याने पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सातारा पोलिस दलातील चार जवान गंभीर जखमी झाले.
स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये भोसलेच्या कमरेत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या चकमकीदरम्यान इतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
लखन भोसले हा सातारा व सांगली जिल्ह्यातील जबरी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित होता. दोन दिवसांपूर्वीच त्याने एका महिलेकडून चेन हिसकावून पोलिसांना चकवा दिला होता. या घटनेनंतर सातारा पोलिसांचे विशेष पथक त्याच्या शोधात होते.
शिक्रापूरमध्ये पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सातारा पोलिस दलात संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी झालेल्या चार पोलिसांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला असून पसार झालेल्या आरोपींचा पाठलाग करण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सातारा पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 149