जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई, ता.३१ : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून आझाद मैदानावर मराठा बांधवांचा महासागर उसळला आहे. भगव्याच्या लाटेत लाखोंच्या संख्येने आंदोलक दाखल झाले असताना, जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सदावर्ते-पाटील दाम्पत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यातून पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीचा त्यांचा संवाद समोर आला आहे. जयश्री पाटील यांनी पती सदावर्तेंना “लय खालच्या लेव्हलवर बोलू नका, नाहीतर मराठा मोर्चा आपल्याकडेच वळेल” असा सल्ला दिल्याचे स्पष्ट ऐकू येते. यामुळे हे दाम्पत्य घाबरले असल्याचे मराठा आंदोलकांचे म्हणणे आहे.
याआधीही सदावर्ते यांच्या घराबाहेर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. मात्र आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना या दाम्पत्यावर तीव्र शब्दांत टीका केली असून, “मराठा आरक्षणाविरोधात लढणाऱ्यांचे घर कुठे आहे?” अशी विचारणा देखील सुरू केली आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी जयश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवावे, अशी मागणी केली. सुप्रिया सुळे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत शरद पवारांविरोधातही त्यांनी टीका केली.
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एका बाजूला लाखो मराठा समाजबांधव मुंबईत धडकले असताना दुसऱ्या बाजूला विरोधक दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल होऊन या आंदोलनाला नवा कलाटणीचा सूर लागला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 300