जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती, ता.१ : मराठा क्रांती मोर्चा, बारामती तर्फे समाज बांधवांना केलेल्या एका छोट्याशा आव्हानाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. मुंबईतील चालू असलेल्या लढ्यासाठी शिदोरीच्या स्वरूपात अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य देण्याचे आवाहन मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच केले. हे आवाहन समाजापर्यंत पोहोचताच, बारामती व परिसरातील मराठा बांधवांनी केवळ काही तासांत प्रचंड प्रमाणात साहित्य जमा करून समाजातील ऐक्य, उत्साह व निःस्वार्थ भावनेचे दर्शन घडवले.
अवघ्या तीन तासांच्या अल्पावधीत जमा झालेल्या शिदोरीत तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त भाकरी, ४० बॉक्स ठेचा, चटणी व लोणचे, २५ पोती फरसाण, ५०० पेक्षा अधिक बिस्कीट बॉक्स, हजारो राजगिरा लाडू-वड्या, २५०० पेक्षा अधिक पाण्याचे बॉक्स, केळी, संत्री व इतर फळे, तसेच दीर्घकाळ टिकणारे खाण्याचे पदार्थ यांचा समावेश आहे. या प्रचंड प्रमाणामुळे केवळ कार्यकर्तेच नव्हे, तर संपूर्ण समाज भावुक झाला.
मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांच्या मते, “हा प्रतिसाद केवळ समाधानकारक नाही, तर मराठा समाजाची बांधिलकी, आपुलकी आणि एकमेकांसाठी उभे राहण्याची परंपरा अधोरेखित करणारा आहे. काही तासांत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिदोरी जमा होणे म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाने संघर्षाला स्वतःची जबाबदारी मानली आहे, याचे हे द्योतक आहे.”
या उपक्रमाने बारामतीकरांचे समाजासाठीचे योगदान अधोरेखित झाले आहे. गावोगावी महिलांनी भाकऱ्या तयार करत सहभाग नोंदवला, तर युवकांनी साहित्य वाहतुकीची जबाबदारी घेतली. ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपली आर्थिक मदत पुढे करून एकात्मतेचे दर्शन घडवले. त्यामुळे या चळवळीत प्रत्येक वयोगटातील लोक एकत्र आल्याचे चित्र दिसून आले.
आजच्या काळात समाजातील वैचारिक मतभेदांपेक्षा एकतेची ताकद अधिक महत्त्वाची ठरते, हे बारामतीकरांनी या प्रतिसादातून दाखवून दिले. हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यात समाजाच्या प्रत्येक घटकाने आपला वाटा उचलल्याने मराठा चळवळीला नवे बळ मिळाले असून, आगामी काळातील संघर्ष आणखी भक्कम होईल, याबाबत कोणतीही शंका नाही.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 139