संपादकीय – जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- (दि.८ मार्च) संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असला तरी या अमानुष कृत्यामागे लपलेल्या कटकारस्थानाची आणि गुन्हेगारांच्या उन्मत्त मानसिकतेची सखोल तपासणी करणे गरजेची आहे. कारण हा केवळ एक खून नव्हता ही तर सत्ता, पैसा आणि गुंडशाही यांच्या संगनमताने उभी राहिलेली सर्वात मोठी दहशत होती!
या खुनाच्या घटनेच्या काही क्षणांनंतरच जेव्हा सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो झळकले, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली हे भ्याड कृत्य करणाऱ्यांना कायद्याची जराही भीती राहीलेली नाही! इतक्या निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या टोळीने कोणत्याही प्रकारचा मुखवटा न वापरणे, अंगावर कसलाही प्रकारचा दबाव न जाणवणे, अगदी खुलेआमपणे आपली दहशत दाखवणे, यावरून या गुंडांचा आत्मविश्वास हा दिवसोंदिवस वाढताना दिसतो. हा आत्मविश्वास कोठून आला? कोणाच्या आशिर्वादाने हे एवढे हिंस्र कसे झाले? याची उत्तर अजून ही अनुत्तरीतच आहेत ती तपास यंत्रणांकडून कधी मिळणार ?
वाल्मिक कराड टोळी – गुन्हेगारीची पार्श्वभूमी आणि सवय काय?
गँगस्टर अरुण गवळी, छोटा राजन, अमर नायक, दाऊद यांच्या टोळ्यांनी हजारो हत्या केल्या असतील, परंतु त्यांनीही खून करताना फोटो काढण्याची किंवा व्हिडिओ बनवण्याची हिम्मत कधी केली नाही. कारण गुन्हेगार कितीही मोठा असला तरी कायद्याच्या साखळदंडाची त्याला भीती असते. पण वाल्मिक कराड टोळीतील गुंडांना मात्र ती कसल्याही प्रकारची भीतीच नव्हती!
एवढ्या निर्घृणपणे, क्रूरतेने एका व्यक्तीला ठेचून मारताना त्यांच्यात जराही दयाभाव का नव्हता ?
याचा अर्थ असा होतो की, ही टोळी अशा प्रकारचे गुन्हे करण्याची सवय झालेली टोळी आहे.
फक्त या हत्येचा नाही, तर संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्कचा तपास यामध्ये व्हायला हवा!
वाल्मिक कराड टोळीने आतापर्यंत किती जणांचे जीव घेतले आहेत? कोणाकोणाला धमक्या दिल्या आहेत? कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत? याचा संपूर्ण तपास हा व्हायलाच हवा. पोलिस प्रशासनाने केवळ एका खुनाचा तपास करून थांबता कामा नये. ही टोळी अजून किती गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील आहे, याची खोलवर चौकशी हि झालीच पाहिजे!
संतोष देशमुख यांना न्याय हा मिळायलाचं पाहिजे
संतोष देशमुख यांचा निघृण पद्धतीने केलेला खून हा केवळ एका व्यक्तीमत्वाचा खून नाही, तर तो मराठा समाजाच्या अस्मितेवर झालेला भ्याड हल्ला आहे. प्रशासनाने या गुन्हेगारांना फक्त अटक करून थांबू नये, तर त्यांना भररस्त्यात फाशी देऊन याचे मुर्तीमंत उदाहरण कायम करावे. तसेच अशा गुन्हेगारांना चांगली जरब बसावी म्हणून कायद्यामध्ये बदल करून कठोरातल्या कठोर शिक्षेचे प्रयोजन करण्यात यावे. तसेच अशा घटनांचे निर्णय तात्काळ लावण्यात यावेत जेणेकरून गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असे धाडस पुन्हा कधीही करण्यास धजावणार नाहीत.
हा लढा फक्त संतोष देशमुख यांचा नाही तर तो प्रत्येक घटकातील व्यक्तीमत्वाच्या अस्तित्वाचा आहे! नाहीतर अशी गुन्हेगारी फोफावत गेल्याशिवाय राहणार नाही.
गुन्हेगारीच्या साखळदंडाची शृंखला तोडायची असेल, तर आज प्रत्येक समाजातील व्यक्तीला याविरुद्ध एकजूटतेची मोट ही पुढील काळात बांधावी लागेल. प्रत्येक समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे. जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा पुढे सुरूच राहणार असल्याचे मराठा समाज तथा संघटनांकडून यावेळी सांगण्यात आले.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह