जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि मागच्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून राज्यसरकारच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब कोल्हे यांची सुद्धा सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्यानं गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. तसेच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या ७ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी ॲड उज्वल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी सरकारच्या वतीने मान्य करण्यात आली आहे. उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, म्हणून हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व धनंजय देशमुख यांनी राज्य सरकारचे स्वागत केलं आहे.
ॲड उज्वल निकम यांनी १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यापासून ते २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंत चे सर्व खटले यशस्वीरित्या लढवले आहेत. मस्साजोग येथे सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्य सरकारच्या आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व कै.संतोष देशमुख यांच्या आई शारदाबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणी सुद्धा घेतलेलं नाही. धनंजय देशमुख यांचा रक्तदाब हा सामान्य असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा निरोप काय होता?
केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे धनंजय देशमुख यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. आपल्या मागण्या मान्य होत आहेत आपण आपले आंदोलन स्थगित करण्यात यावे असा निरोप पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यावतीने वैभव पाटील यांनी धनंजय देशमुख यांना उपोषणस्थळी जाऊन देण्यात आला.
मस्साजोग ग्रामस्थांच्या ७ प्रमुख मागण्या काय आहेत ?
सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पीएसआय राजेश पाटलांनी तो कोणाच्या सांगण्यावरून कळंबच्या दिशेने वळवला याची चौकशी करण्यात यावी.
वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे सीडीआर तपासून त्यांना सुद्धा या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे.
आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून त्यांना सुद्धा सहआरोपी करण्यात यावे.
याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.
केजचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करावे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह