जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
दौंड : (दि.२४)कुरकुंभ (ता. दौंड) येथील असणाऱ्या फिरंगाईदेवी मंदिरासमोरील स्थापत्य शास्त्राचा आदर्श नमुना असणारा ध्वजामंडप हा अचानक प्रकाशझोतात आणण्याचे काम हे इतिहास अभ्यासकांनी केले असून या मंडपाचे बांधकाम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे अप्रकाशित मोडी लिपीतील आज्ञापत्रामधून प्रथमच समोर आले आहे. या संदर्भात कुरकुंभ येथील असणारे देवीचे पुजारी , मच्छिंद्र भगत यांनी पुरालेखागार कार्यालय पुणे येथून माहिती मागवली होती. त्यानंतर संबंधित कार्यालयातून मिळालेल्या मोडी लिपीतील आज्ञापत्राचा अभ्यास करून इतिहास संशोधक, मोडी लिपी वाचक कांचन कोठावळे (पुणे) यांनी याबाबतची माहिती दिली.
संबंधित आज्ञापत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी खरे जंत्रीनुसार २७ ऑगस्ट १६९८ रोजी तत्कालीन पाटस येथील देश अधिकारी नरहरी आपदेव, पंडितराव यांना दिले आहे. या आज्ञापत्रातील ध्वजामंडपाच्या उल्लेखामुळे या ध्वजामंडपाचं बांधकाम प्रथमच शिवकालीन असल्याचे समोर आले आहे. आज्ञापत्रामध्ये कुरकुंभगावचा उल्लेख हा कुरकुंब असा त्याकाळात करण्यात आला आहे.
फिरंगाई देवीचे तत्कालीन पुजारी कृष्णाजी, सुभानजी भगत यांनी सातारा येथे जाऊन छत्रपती राजाराम महाराजांची भेट घेतली होती. तसेच महाराजांना फिरंगाई देवस्थान जागृत असल्याचे सांगितले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरंगाई देवीचा ध्वजामंडप बांधला आहे. महाराजांच्या काळामध्ये कुरकुंभच्या फिरंगाईदेवीचा नंदादीप, पूजा, नैवेद्य, अभिषेक नियमित असायचे. त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या काळामध्ये ‘धामधुमीचा प्रसंग जाहला’ आणि ‘धामधुमीचा काळ मुलखात गेला’ असा उल्लेख ही या आज्ञापत्रात आहे. म्हणजेच त्या काळामध्ये युद्ध व धामधुमीचा काळ असल्याने फिरंगाई देवीचे उत्सव करण्याचे काम थांबले होते.हे उत्सव पुन्हा सुरू करावेत अशी विनंती भगत बंधूंनी छत्रपती राजाराम महाराजांना केली होती.
फिरंगाईदेवीच्या ध्वजामंडपाचा इतिहास
फिरंगाई देवीचा ध्वजामंडप छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला हा इतिहास सर्वप्रथम जनतेसमोर समोर आणताना अत्यंत आनंद होत आहे. तसेच या वास्तूचा इतिहास समोर आणल्यानंतर या देवीचे ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे.या नवीन पुढे आलेल्या इतिहासामुळे कुरकुंभ आणि पर्यायाने दौंड तालुक्याच्या वैभवामध्ये भर पडली आहे. – कांचन कोठावळे, इतिहास अभ्यासक व मोडीलिपी तज्ञ
त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या आज्ञापत्रात देवीचे उत्सव पूर्ववत करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. या आज्ञापत्रामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज असताना देवीचे कार्य हे सुरळीत सुरू होते. असेच कार्य नियमित चालविल्यास राज्याचे कल्याण होईल.
तसेच या पत्रामध्ये देवीचे भोग, पूजा, नंदादीप, पुराणिकांचे वर्षासन, नित्य अभिषेकी ब्राह्मण यांचे वर्षासन, अन्नछत्र नेमणूक करण्याची आज्ञा अष्टप्रधान मंडळातील पंडितराव यांना केली आहे.” या आज्ञापत्रावरुन छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज कुरकुंभ येथील फिरंगाईदेवीची केलेली भक्ती प्रथमच समोर आणण्याचे मोठ काम हे इतिहास अभ्यासक तथा मोडी लिपी तज्ञ कांचन कोठावळे यांनी केल्याने खरा इतिहासात सर्व सामान्यांना समजू लागला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह