जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- (दि.२०) नवीन प्रदर्शित झालेल्या “छावा” या हिंदी चित्रपटाद्वारे छ्त्रपती शंभूराजेंना त्यांच्या आयुष्यात सर्वात जास्त छळून त्यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना सरळसरळ क्लिन चिट देऊन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या प्रवृत्तींवरील रोख हा दुसरीकडे वळविण्यात आला आहे.
संभाजी महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत त्यांचे सख्खे मेहुणे जबाबदार होते असे या चित्रपट पाहणाऱ्या नवीन पिढीच्या मेंदूत ठसवण्यात आले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की, “जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही आपला इतिहास घडवू शकत नाही.” त्यामुळे आपल्या इतिहासासंबंधी जागरूक राहुन तथ्याधारीत चिकित्सा करणे गरजेचे आहे. विविध माध्यमांचा वापर करुन आपला खरा इतिहास नष्ट करुन खोट्या इतिहासाची मांडणी करणाऱ्यांची सत्ता बळकट होत असताना आपला बेफिकीरी निष्काळजीपणा हा चिंताजनक आहे. हे कटकारस्थानी षडयंत्र एकजुटीने हाणून पाडले पाहिजे.
या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांच्या हत्येत गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के यांचा समावेश नसताना, संभाजी महाराज कैद होताना त्यांना तिथे प्रत्यक्ष उपस्थित दाखवून त्यांना विनाकारणच यात गोवले जाऊन खऱ्या गुन्हेगारांवर पडदा टाकून संभाजी महाराजांच्या सख्ख्या मेहुण्यांवर दाट संशय निर्माण करण्यात आला आहे.
गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा समकालीन इतिहासात उपलब्ध झालेला नाही. तर या स्वराज्यद्रोही कृत्यात संभाजी महाराजांच्या राजदरबारातील ब्राह्मण सल्लागारांनी संभाजी राजेंचे परममित्र कवी कलश याच्यावरील असुया, ईर्षा व रागामुळेचं मोगल लष्कराच्या सेनानायकांशी संधान साधून, संभाजीराजेंशी बेईमान होऊन त्यांच्या संगमेश्वर मुक्कामाची वर्दी दिली होती याचा पुरावा उपलब्ध आहे. फ्रांसीस मार्टीन या फ्रेंच अधिकाऱ्याने आपल्या रोजनिशीत या घटनेची नोंद त्यावेळी करून ठेवलेली आहे.
या उलट संभाजी महाराजांच्या युवराजांना म्हणजेच शाहूराजेंना औरंगजेबाने कैद केल्यानंतर शाहुमहाराजांचे लग्न औरंगजेबाच्या छावणीत औरंगजेबाने लावून दिले ते सरदार राणोजी राजेशिर्केंच्या सकवारबाईंसोबत.
पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा शाहुराजेंची कैदेतून सुटका करण्यात आली व शाहूराजेंची महाराणी ताराबाईंसोबत लढाई होवून सातारा गादी वेगळी करण्यात आली तेव्हा शाहूराजे यांनी यांच्या मृत्यूपर्यंत मराठा साम्राज्य अटकेपार नेले व छ्त्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार केले.
शाहूराजेंच्या अंतिमसमयी कटकारस्थाने करून आणि सकवारबाई राणीसाहेब यांच्या कुटुंबियांना धमक्या देऊन व राणीसाहेबांची चहूबाजूंनी कोंडी करुन स्वराज्याच्या राणीसाहेब सकवारबाई साहेबांना जबरदस्तीने सती म्हणून जिवंत जाळण्यात आले. याचे कारण होते की त्या शिर्के घराण्यातून आलेल्या व राज्यकारभारनिपूण कर्तबगार स्त्री होत्या. त्यांचा आग्रह होता की शाहूराजेंच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या संभाजीराजेंना म्हणजेच छत्रपती राजारामराजेंच्या अनुभवी युवराजाला दत्तक घेऊन सातारच्या गादीवर बसवावे. या गोष्टीला पेशव्यांचा प्रचंड विरोध होता. त्यांच्या म्हणण्यानुसार अल्पवयीन राम राजेंना दत्तक घेण्याचे होते.
या गोष्टीला सकवारबाईसाहेबांचा सक्त विरोध होता कारण तसे झाले तर छत्रपती अल्पवयीन असल्याने राज्य पेशव्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका होता.
अखेर शेवटी नाना कटकारस्थाने करुन, सकवारबाई साहेबांचा जीव घेऊन नानासाहेब पेशव्याने स्वराज्य घशात घातलेच व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महान पराक्रमाच्या जोरावर उभारलेले रयतेचे राज्य, स्वराज्य हे लयाला गेले.
छत्रपती संभाजीराजेंना पकडून देण्यात गणोजी तथा कान्होजी शिर्के यांचा कोणताही सहभाग नव्हता आणि याचा कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा किंवा कागदपत्र सापडलेले नाही अथवा उपलब्ध नाही याविषयी महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख संचालनालयानेदेखील खालील पत्रक जारी केलेले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह