जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बीड :- ( दि.३ फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची अखेरीस अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे.
गेल्या दोन वर्षांतील प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चर्चा व तपास करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.
आयुक्त सुषमा कांबळी यांच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या या समितीमध्ये तिघांचा समावेश केला आहे. धाराशिव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे समितीचे अध्यक्ष असतील तर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अपर संचालक म. का. भांगे आणि जालना जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे सदस्य राहतील.
या तिन्ही सदस्यीय समितीने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाची माहिती मागवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी झेडपी सीईओ आणि नगर पालिकेच्या सीओंना पत्र पाठवून तात्काळ माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2023-24 आणि 2024-25 मधील कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेची चौकशी करणे, शासकीय नियम व तरतुदीनुसार सर्व संबंधित अभिलेख तपासणे, कामांची सद्य:स्थिती पाहणे व त्यांच्या तांत्रिक मान्यतेची तपासणी करणे, असे या समितीला निर्देश दिले आहेत. या चौकशीसाठी समितीला आठवडाभराचा कालावधी दिला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 73 कोटी 36 लाख रुपयांचे काम न करता बोगस बिलं संकलन केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यांनी अजित पवार यांना या संबंधी लिखित तक्रार आणि पुरावे सादर केले आहेत. तसेच या आरोपांचा तपास करण्यासाठी पेन ड्राईव्ह ही अजित पवार यांच्याकडे दिला आहे. आता या आरोपांची गंभीर दखल घेत समिती स्थापन करण्यात आली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह