जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : – तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्यालयासमोर पूर्वीच्या वादातून दिवसाढवळ्या एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या घटनेच्या केवळ १२ तासांत गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने गुन्ह्यात सहभागी असलेल्या ११ आरोपींची नावे उघड केली आहे.त्यापैकी २ जणांना अटक करण्यात आली असून, चार किशोरवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शुक्रवार (दि. ३१) सायंकाळी ५:४५ वाजता झालेल्या या घटनेतील मृत तरुणाचे नाव आर्यन शंकर बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव स्टेशन, मावळ, पुणे) असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिवराज भगना कोळी (वय २०, समता कॉलनी, वरळे, मावळ, पुणे) आणि सूरज लक्ष्मण निर्मळ (वय २२, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, पुणे) यांना अटक केली असून, त्यांचे साथीदार असलेल्या चार किशोरवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांनी त्याच्या पाच फरार साथीदारांचा शोध सुरू केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या माहितीनुसार, काल संध्याकाळी हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर युनिट पाचचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास केला. वेगवेगळ्या पथकांनी या दोन्ही आरोपी आणि त्यांच्या साथीदारांना तळेगाव दाभाडे, वाल्हेकर वाडी, पुणे स्टेशन, सांगवी येथून ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने कबूल केले की शिवराज चा भाऊ संतोष कोळी वरील हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आर्यन बेडेकर ची हत्या केली. सर्व आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह