जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :- पुणे जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडत आहे ज्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज पूर्णपणे डिजिटल झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली, ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेल्या ई-ऑफिस प्रणालीचा पूर्णपणे अवलंब करण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागात ई-फाइल्सच्या माध्यमातून 100 टक्के ऑनलाइन काम सुरू झाले आहे.
ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, सर्व विभागांना ई-ऑफिस प्रणालीनुसार कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रणालीमुळे कोणतीही फाइल काही मिनिटांत शोधणे शक्य झाले आहे. मध्यवर्ती आवक-जावकसह सर्व विभागांमध्ये ‘ई- ऑफिस’ प्रणाली राबविली जात आहे, ज्यासाठी संगणक आणि उच्च क्षमतेचे स्कॅनरच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (एनआयसी) चांगली संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे.
फाइल्सचा प्रवास होणार सुलभ
पूर्वी फाइल्सचा प्रवास एका विभागातून दुसर्या विभागाद्वारे जिल्हाधिकार्यांपर्यंत होत असे, ज्यामुळे त्या फाइल्सला ट्रॅक ठेवणे शक्य नव्हते. ई ऑफिसमुळे कोणत्या विभागाकडून कोणता प्रस्ताव आला आहे, तो कोणाकडे आहे हे सहज कळणार आहे. तसेच, त्या प्रस्तावावर जिल्हा प्रशासन, तहसीलदार तसेच प्रांताकडून कोणती कार्यवाही झाली हे कळणार आहे, ज्यामुळे फाइल्सवर वेगाने कार्यवाही होऊन प्रकरणांचा निपटारा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रांत, तहसील कार्यालयांचे काम प्रलंबित
दुसरीकडे, प्रांत, तहसील आणि मंडल कार्यालयात ई-ऑफिसचे काम रखडले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की केंद्र सरकारकडे नवीन ई-मेल, पासवर्ड मागणी करण्यात आली असून, लवकरच ते मिळणार आहे. त्यामुळे या विभागाचे कामसुद्धा पुढील काही दिवसांत ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती दिली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह