जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पंजाब :- नोकरी करणारा दीपक (वय २४) हा लग्नासाठी महिन्याभरापूर्वी पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील मूळ गावी आला. शुक्रवारी त्याचा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. यासाठी १५० पाहुण्यांची वरात घेऊन नवरदेव मोगा शहरात पोहोचला. लग्नाची सजवलेली गाडी, डोक्याला मुंडाळ्या, शेरवानी घालून नवरदेव लग्नस्थळी पोहोचला खरा, पण तिथे त्याच्या स्वप्नातली नवरी मात्र नव्हती. इन्स्टाग्रामवरून भेटलेली मनप्रीत कौर नावाची तरुणी अस्तित्त्वात तरी आहे का? असा प्रश्न आता दीपक आणि त्याच्या कुटुंबियांना पडला आहे.
सोशल मीडिया वरील माणसं आणि त्यांची मैत्री, प्रेम किती बोगस असतं, याचे असंख्य दाखले आजवर पाहायला मिळाले आहेत. तरीही या मोहजालात रोज कोणी ना कोणी अडकत असतं. पंजाब मधील मोगा शहरात तोंडात बोटं घालायला लावणारा प्रकार घडला आहे.
दीपक आणि मनप्रीत कौर यांची तीन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आधी चॅटिंग आणि नंतर मोबाईल वरील संभाषणाद्वारे दोघांचं प्रेम बहरत गेलं. फोनवरच दोघांनी लग्न ठरवलं. दोघांच्या पालकांनी फोनवरच लग्नाची बोलणी केली. ६ डिसेंबर चा लग्नाचा मुहूर्त ठरला. दीपक आणि त्याचे कुटुंबिय आणि दहा-बारा पाहुणे घेऊन लग्न करणार होते. पण वधुकडच्या लोकांनी सांगितलं, चांगले १५० लोक आणा, काही हरकत नाही. शुक्रवारी १५० पाहुण्यांची वरात घेऊन दीपक तेथे पोहोचला. पण मोगा शहरात नवरी कडील लोकांनी सांगितलेले मंगल कार्यालयचं अस्तित्त्वात नसल्याचं समोर आलं.
दीपक म्हणाला की, आम्ही आजवर कधीही समोरासमोर भेटलो नव्हतो. मी तिचा केवळ फोटो पाहिला होता. आता तो तिचाच फोटो होता का? याचीही शंका येते. मनप्रीतनं सांगितलं होतं की, रोझ गार्डन पॅलेस मध्ये लग्न ठेवलं आहे. पण असं काही मंगलकार्यालयचं मोगा शहरात नाही. तसेच मनप्रीतने लग्नाच्या खर्चासाठी ५० हजार रुपये मागितले होते. ते तिला ऑनलाईन पाठवून आपली फसवणूक झाल्याचेही दीपक ने माध्यमांना सांगितले.
शुक्रवारी दुपारी वरात मोगा येथे पोहोचली. दीपक ने मनप्रीत ला फोन लावला. तिने सांगितले की, तिचे काही लोक वराती ला घ्यायला लगेच येत आहेत. मात्र पाच तास थांबून सुद्धा कोणीही आलं नाही. थोड्या वेळाने दीपक मनप्रीत ला वारंवार फोन लावत होता, पण मनप्रीत चा फोन त्यानंतर स्विच ऑफ येत होता. पाच तास वरात ताटकळत राहिल्यानंतर अखेर त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठून मनप्रीत आणि तिच्या कथित कुटुंबिया विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारी दरम्यान दीपक ने तीन वर्षांपासूनचा सर्व घटनाक्रम सांगितला.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह