जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :- थंडीचा मोसम सुरू झाल्यामुळे अंड्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे अंड्याचे दर सुद्धा कडाडले असून १०० अंड्याला ६७५ रुपये हा उच्चांकी बाजारभाव आता मिळत आहे. त्यामुळे अंडी उत्पादक पोल्ट्री व्यावसायिकांचे अच्छे दिन आले आहेत.दरवर्षी साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा थंडीच्या दिवसात अंड्याचा वापर आहारात मोठ्या प्रमाणावर केला जातो. विशेष करून व्यायाम करणारे तरुण ते लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण अंडी मोठ्या प्रमाणावर खातात. घरगुती वापर, बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांडून अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या एक डझन अंड्यांचा दर हा ९६ ते १०८ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर ठोक बाजारात १०० अंड्याचा दर ६७५ रुपये गेला आहे. हा दर आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी असल्याचे बोलले जात आहे.
मागील दोन वर्षापासून अंडी उत्पादन करणारे नवीन पोल्ट्री फार्म उभे राहत नाहीत. कारण चार वर्षापासून कोंबड्यांच्या खाद्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे बाजारभाव गगनाला भिडले होते. त्या पटीत अंड्याचे दर वाढत नव्हते. अंडी उत्पादन करणाऱ्या एका पक्षासाठी अंडी उत्पादन सुरू होईपर्यंत ८०० ते ९०० रुपये खर्च येतो. वाढत्या शहरीकरणामुळे शहरालगत असलेल्या जागेचे चांगले पैसे होत असल्याने अनेक व्यावसायिकांनी पोल्ट्री व्यवसाय बंद करून शेडच्या जागेची विक्री केली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी झाले. प्रथिने शरीरासाठी चांगले असल्याने सर्वात कमी किमतीत भेसळ विरहित नैसर्गिक प्रोटीनचे मोठे स्रोत असणारा पदार्थ म्हणजे अंडे होय. त्यामुळे अंड्याला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. हा उच्चांकी दर कदाचित शंभर अंड्यासाठी ७०० रुपये पार करू शकतो. जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत हा दर असाच राहू शकतो.
डॉक्टर प्रसन्न पेडगावकर, महाव्यवस्थापक, व्यंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह