जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
संपादकीय :- निवडणुकांपूर्वी भाजपला रामराम करुन शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची तुतारी फुंकणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब सहपरिवार नव्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडून तब्बल २० हजार मतानं पराभव झाला आहे. त्यामुळे, या ताबडतोब भेटीने अनेकांच्या भुवया हया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कुटूंबीयांनी श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अंकिता पाटील यांनी पुष्पगुच्छ देत देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन केले.
यावेळी त्यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, राजवर्धन पाटील हे उपस्थित होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना भाजपमधून तिकीट मिळत नव्हते, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या निवडणूकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये हर्षवर्धन पाटील यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. असं असताना हर्षवर्धन पाटील यांनी सागर बंगला गाठल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. तर, हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब सहपरिवार देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केले आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह