जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
कुर्डुवाडी : मुकादमाने घाईघाईने ट्रॅक्टर चालविल्याने तो विहिरीत पडून या दुर्गघटनेत ऊसतोड कामगारांच्या तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना सोमवार दिनांक २ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिंगेवाडी तालुका.माढा येथे घडली आहे.
रिंकू वसावी (वय ३), आरव पाडवी (वय ४), नीतेश वसावी (वय ३, सध्या सर्व रा. शिगेवाडी ता. माढा) अशी मृत मुलांची नावे आहेत. सुखलाल करमा वसावी (रा. पिंपळबारी ता. धडगाव जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकादम खिमजी जालम्या तडवी याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वसावी हे शिंगेवाडी येथे ऊसतोड कामगार म्हणून राहण्यास होते. दुसऱ्या शेतामध्ये ऊसतोडणी करण्यासाठी (एम. एच. ४५ ए. एल. ४७५३) या ट्रॅक्टरला गाडी जोडून मुकादम खिमजी हा फिर्यादी वसावी त्यांची पत्नी सायकू वसावी, मुलगी रिंकू, उसतोड जोडीदाराची पत्नी निमा शिवा वसावी, तिचा मुलगा नीतेश शिवा वसावी, परमिला वसंत पाडवी व तिचा मुलगा आरव वसंत पाडवी यांना घेऊन सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेताकडे निघाला होता.
सदर ट्रॅक्टर मुकादम खिमजी स्वतः चालवत होता. नागनाथ शिंदे यांच्या शेतातील बिरोबा मंदिराजवळील सदर शेतामध्ये विहीर असल्याचे माहिती असतानासुद्धा अविचाराने, हयगयीने धोकादायक रित्या चालविल्यामुळे सदर ट्रॅक्टर विहिरीतील पाण्यात पडला.यावेळी पोहता येणारे पुरुष पाण्याबाहेर पडले. महिलांनाही पाण्यातून बाहेर काढले. घटना समजताच ग्रामस्थांनी मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच क्रेनच्या सहायाने ट्रॅक्टर बाहेर काढला.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह