जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
भोर :- भोर विधानसभा मतदार संघातील तीन तालुक्यातील मतदान आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गुरुवार दि. २१ रोजी जाहीर केली होती. यामध्ये तीन तालुक्यातील एकूण मतदान ४ लाख ३० हजार २७८ पैकी ६७.७९ टक्के मतदान झाले असून यात १ लाख ५६ हजार ९१२ पुरुष मतदार, १ लाख ३४ हजार ७८९ महिला मतदार तर ३ तृतीयपंथी व उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत एकूण मतदान २ लाख ९१ हजार ७०४ असे मतदान झाले आहे.
भोर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे, महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शंकर मांडेकर, शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे व भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील हे चार प्रमुख उमेदवार रिंगणात होते. चारही उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावून जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. यामध्ये बऱ्याच कालावधीनंतर मुळशी मधील स्थानिक उमेदवाराला प्रमुख पक्षाची उमेदवारी मिळाली होती, तसेच मुळशीमधील अपक्ष उमेदवार दगडे पाटील यांनी देखिल चांगली ताकद लावली होती. मुळशी मध्ये झालेल्या १ लाख २६ हजार ६०७ मतांमध्ये कोण जास्त वाटा घेतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील मतदानाची आकडेवारी
यामध्ये भोर तालुक्यात १ लाख ७० हजार २१३ मतदारांपैकी एकूण १ लाख २५ हजार १७६ मतदारांनी ७३. ५४ टक्के मतदान केले. त्यात ६६ हजार ५ पुरुष मतदार, तर ५९ हजार १६९ महिला व २ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
राजगड तालुक्यात एकूण ५४ हजार ५० मतदारांपैकी ३९ हजार ९२१ मतदारांनी ७३. ९६ टक्के मतदान केले. यामध्ये २१ हजार ६२२ पुरुष, १८ हजार २९८ महिला, तर तृतीयपंथी एक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.
मुळशी तालुक्यातील २ लाख ६ हजार १५ मतदारांपैकी एकूण १ लाख २६ हजार ६०७ मतदारांनी ६१. ४६ टक्के मतदान केले. त्यामध्ये ६९ हजार २८५ पुरुष, ५७ हजार ३२२ महिला व तृतीयपंथी शून्य मतदारांचा समावेश आहे.
भोरमध्ये सुध्दा मुळशी तालुक्याच्या तोडीस तोड १ लाख २५ हजार १७६ मतदान झाले आहे. यामध्ये आमदार संग्राम थोपटे आपल्या ठाम मतांत किती वाढ करतात तसेच अपक्ष असले तरी कुलदीप कोंडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती, ते किती मतदान घेतात तसेच या दोघांच्या बरोबर राष्ट्रवादीचे भोर मधील मतदाना बरोबर नविन मतदान खेचण्यात शंकर मांडेकर किती यशस्वी होतात, किरण दगडे पाटलांनी सामाजिक उपक्रमांमधून भोरमध्ये चांगला जनसंपर्क तयार केला आहे. त्याचा त्यांना किती फायदा होतो? हे देखिल विजयासाठी पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
भोर विधानसभा मतदार संघातून यावेळी मतदानाचा टक्का वाढला असून मागील निवडणुकीत ६२.९१ टक्के मतदान झाले होते ते आताच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी वाढून य ६७.७९ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच जवळपास ५ टक्के मतदान हे यावेळेस वाढलेलं आहे त्यामुळे या वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचा फायदा कुणाला होतो हे २३ तारखेच्या मतमोजणीवेळीच समजणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह