जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
भोर :- भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून चौथ्या वेळी संग्राम थोपटे निवडणूक रिंगणात होते. भोर विधानसभा मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. त्यामुळे या ठिकाणी तोडीस तोड देणारा उमेदवार देण्याचं आव्हान महायुती समोर होतं. हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा यासाठी भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी ही इच्छुक होती.
पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. भोर म्हणजे थोपटे घराणे आणि थोपटे घराणे म्हणजेच भोर असं गेल्या अनेक वर्षाचे समीकरण येथे बनलं होतं.त्या ठिकाणी संग्राम थोपटे यांचा पराभव करणे हे जवळपास अशक्य असल्याचं निवडणुकीपूर्वी बोललं जात होतं. मात्र, अजित दादा पवारांनी उमेदवार देताना शेवटच्या क्षणी आपली खेळी केली व काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघ आपल्याकडं काबीज करून घेतला.
अजित दादा पवारांनी यंदा या मतदारसंघांमध्ये उमेदवार देताना भोर परिसरातला न देता तो मुळशी तालुक्यातला दिला. यंदा मुळशी भागातलं मतदान देखील भोर तालुक्यापेक्षा जास्त होतं. त्यामुळे मुळशी मधून चांगलं मताधिक्य घेतल्यास संग्राम थोपटे यांचा पराभव होऊ शकतो हे सूत्र मनाशी बाळगूनचं अजित दादा पवार यांनी मुळशीचा उमेदवार दिला होता.
त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच मुळशी येथील उमेदवार मिळाल्याने मुळशीकरांनी मांडेकरांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिलं. मुळशी परिसरातून मांडेकर हे तब्बल साठ हजारांनी संग्राम थोपटे यांच्यापेक्षा लिड घेऊन पुढे राहिले. मात्र जेव्हा भोर आणि राजगड तालुक्याच्या परिसरातील मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा मांडेकरांचं लीड हे कमी झालं तरी देखील मांडेकर यांनी तब्बल एकोनीस हजार सहाशे वीस मतांचे लीड घेत विजय मिळविला आहे त्यामुळे थोपटे घराण्याकडं अनेक वर्ष असलेल्या सत्तेला मांडेकरांच्या रूपानं अजित पवारांनी सुरुंग लावण्याचे काम केल्याने येथे परिवर्तन झालं आहे अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगलेली दिसत आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह