जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूरः- पुणे जिल्ह्यातल्या अत्यंत चुरशीच्या लढतीमधील एक आसणारा इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आसून, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुक्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
इंदापूर तालुक्यात जातीच्या राजकारणाचा अनेकदा प्रभाव दिसून आल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे यावेळी जातीच्या राजकारणाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार यावर इंदापूरात सध्या चर्चा होत आहेत.
आता इंदापूर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे, तसेच भाजपमधून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील आणि शरदचंद्र पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे परंतु सध्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले प्रवीण भैया माने असा तिरंगी सामना इंदापूर मध्ये रंगणार आहे.
यंदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत मराठा समाज हा हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण भैया माने यांच्यात विखुरला जाण्याची दाट शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. याचा फायदा दत्तात्रय मामा भरणेंना होणार का? याहून महत्त्वाचं म्हणजे दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सामन्यात अजित पवार आणि शरदचंद्र पवारांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागली आहे. तेव्हा विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? हे येत्या काळात पहावयास मिळणार आहे.
जरांगे पाटील फॅक्टरचा फायदा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो अशी सुद्धा एक शक्यता आहे. तसेच शरदचंद्र पवारांमुळे मुस्लीम समाजाचं एकगठ्ठा मतदान हर्षवर्धन पाटलांना होईल. तसेच मागासवर्गीय समाजाचे सुद्धा बऱ्यापैकी मतदान पाटलांना होईल, परंतु वंजारी समाजाची काही गावं आहेत उदा. लाकडी, निंबोडी,अकोले, लाखेवाडी ही मोठ्या संख्येने ओबीसी फॅक्टर म्हणून दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे जातील.
त्यातच दोन मराठा उमेदवारांमुळे मराठा समाज विखुरला जाणार आसल्याने, याचा फायदा दत्तात्रय मामा भरणेंना होईल. असे असले तरीही शेवटच्या क्षणाला, हर्षवर्धन पाटलांचं पारडं जड होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
ही निवडणूक धनगर आणि मराठा ध्रुवीकरणावर आधारित आहे, धनगर मतं निर्णायक ठरल्यामुळे लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. आता हर्षवर्धन पाटलांची भिस्त ही शरदचंद्र पवार यांच्यावर आहे. त्यांना वाटतं की आपण शरद पवारांमुळे निवडून येऊ शकतो.
इंदापुर तालुक्यातील जनतेच्या समस्या काय आहेत, त्यांच्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? नक्की जातीच्या फॅक्टरवर का? विकासाच्या फॅक्टरवर इंदापूर विधानसभेसाठी मतदान होणार ? तसेच पाण्याचा प्रश्न या ठिकाणचा अत्यंत महत्त्वाचा आहे. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेमुळे भरणे-पाटील यांच्यात श्रेय वादाची लढाई चालू आहे.
इंदापूर तालुक्यातील रस्त्यांची झालेली कामं सुद्धा निकृष्ट दर्जाची झाली आहेत असं अनेक लोकं म्हणत आहेत, त्यावरुन देखील तालुक्यात नेत्याविषयी नाराजी आहे,बारामती प्रमाणेच इंदापूरमध्ये सुध्दा शरदचंद्र पवार व अजित दादा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे यावेळी हर्षवर्धन पाटलांचे राजकीय अस्तित्वच पणाला लागले आहे.
येणाऱ्या काळात राजकारणात वीस वर्षांची कारकीर्द असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच दहा वर्षांची कारकीर्द असलेले माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि कोरी पाटी असलेले अपक्ष प्रवीण भैया माने यांच्यात कोण बाजी मारेल? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह