जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर :- विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेसाठी उमेदवारी मिळेल या अपेक्षेवर असलेल्या व तयारी सुरू केलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांच्या अपेक्षांवर हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाने त्यांच्या उमेदवारीवर पाणी फेरले, तेव्हापासून ते नाराजच होते. त्यातच त्यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांना इशारा देखील दिला होता. त्यानंतर त्यांनी मेळावा देखील घेतला. याच दरम्यान प्रवीण माने यांनी त्याच व्यासपीठावरून निवडणुकीची घोषणा केली आणि त्यांनी त्यांचा स्वतः उमेदवारी अर्ज भरला. तेव्हापासूनच आप्पासाहेब जगदाळे हे शांतच होते.
महा विकास आघाडीचे इंदापूरचे उमेदवार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी संपूर्ण दिवस व्यस्त कार्यक्रमातून काढून इंदापूरकरांसाठी दिला आणि ते इंदापुरात पोचले आणि तिकडे महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष प्रवेश केलेले आप्पासाहेब जगदाळे यांनी त्यातच घड्याळाचे काटे फिरवले.
दोन दिवसांपूर्वी आप्पासाहेब जगदाळे यांची शरदचंद्र पवार यांच्या बरोबर चर्चा देखील झाली. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. बारामतीत ही चर्चा झाली, मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नव्हता. मात्र तरीही आप्पासाहेब जगदाळे यांनी आपली भूमिका आजपर्यंत स्पष्ट केली नव्हती. आज जेव्हा शरदचंद्र पवार हे इंदापुर मध्ये पोचले, तेव्हा तिकडे आप्पासाहेब जगदाळे यांनी अजित दादा पवार गटाशी संधान साधत. आपली भुमिका आज रोजी स्पष्ट केली आहे.
आप्पासाहेब जगदाळे हे अजित दादा पवार गटात गेल्याने याचा फटका कोणत्या उमेदवाराला बसेल हे निवडणूक झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे कारण इंदापूरचा मतदार हा सुज्ञ आहे त्यामुळे नेता जरी कोणीकडे गेला तरी मतदार राजा हा आपलं मतदानरूपी आशिर्वाद कोणाच्या पारड्यात टाकेल याचा अंदाज भल्याभल्यांना आतापर्यंत लावता आलेला नाही त्यामुळे मतदान होऊन निकालापर्यंत तुर्तास वाट पहावी लागणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह