जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे:- निर्वाचन आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टीफीकेशन ॲण्ड मॉनिटरिंग कमिटी) गठित करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 सालच्या अनुषंगाने निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण या समितीकडून करुन घेणे आवश्यक असल्याचे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच समिती अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी माध्यमांसमोर सांगितले आहे.
उमेदवाराच्यामार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमे (सोशल मीडिया) तसेच फिरत्या एलईडी व्हॅन, ऑटो रिक्षा आदी बाह्य माध्यमाव्दारे देण्यात येणाऱ्या श्राव्य (ऑडिओ), दृकश्राव्य ( ॲडीओ-व्हीज्युअल) जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण या समितीमार्फत केले जाते. तर मुद्रीत माध्यमात (प्रिंट मीडिया) मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाच्या जाहिराती समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयाच्या समोर, पुणे- 411001 येथून चालणार असून भ्रमण दूरध्वनी क्रमांक 020-26121307 असा आहे.
प्रत्येक ऑडिओ जाहिरात किंवा ऑडीओ-व्हीज्युअल जाहिरात ही स्वतंत्र असावी. तसेच एकाच सीडी, पेन ड्राईव्ह मध्ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नयेत. अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता, जाहिरात कोणत्या उमेदवारासाठी आहे. त्याचे नाव, पक्षाचे नाव, जाहिरात कुठे दाखवणार, जाहिरातीचे शीर्षक काय, जाहिरात निर्मितीचा खर्च किती, जाहिरातीतील भाषा याचा स्पष्ट उल्लेख असावा. सीडी मधील मजकूर प्रसारण योग्य असावं. इतरांची बदनामी करणारा, जाती-जातींमध्ये, धार्मिक तेढ निर्माण करणारा नसावा. तसेच देशविघातक कृत्याला प्रोत्साहन देणारा नसावा. तसेच समितीमार्फत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पेड न्यूज वर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 सालच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष (मीडिया सेल) हा ए विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 020- 29972872 असा आहे. या ठिकाणाहून माध्यमांना निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, समाज माध्यमांचे संनियंत्रण येथून होणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह