जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बीडः– साडेतीन मुहर्तापैकी विजयादशमीचा मुहुर्त. दसरा आणि विजया दशमीला विजयाकडे जाण्याचा मार्ग सांगितला जातो. काही असले तरी अन्यायाच्या विरोधात उठाव हा करावाचं लागतो. देवांना सुद्धा अन्यायाच्या विरोधात उठाव केला आहे. छत्रपतींच्या मावळ्याने त्यांचे विचार घेऊन उठाव हा करावा लागतो. आपलाही नाइलाज आहे. इच्छा नसतानाही अडवणूक होणार असेल तर माय बापांनो तुम्हालाही उठाव हा करावाचं लागणार आहे.
मी तर काय केलं आहे. माझ्या समाजानेही काही केलं नाही आमच्या वाट्याला का अन्याय आला? आम्ही काय पाप केली आहेत? आमच्या मराठा समुदायाच्या पाठीमागे फक्त आतापर्यंत अन्यायच आला आहे. तसेच माझा समाज, या महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणात झिजला आहे. त्याने स्वतःच्या शरिराची झीज केली आहे. माझ्या समाजाने दुसऱ्यासाठी मेहनत घेतली आहे. आमचं नेमकं काय चुकलं? आम्ही श्रीमंतावर आणि गरिबांवर कधीही अन्याय केला नाही. आम्ही नेमकं काय केलं, हे कुणी सांगेल का? या राज्यातील शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं? आमची चूक काय आहे, हे कुणीतरी सांगावे,असे मनोज जरांगे पाटील बीड येथील नारायण गडावरील दसरा मेळावा प्रसंगी म्हणाले आहेत.
माझी विनंती आहे, सोन्यासारखी लेकरं वाचवा, समाजाला वाचवा. समाजाला मान खाली घालावे असे कोणीही वागू नका. लेकराची आणि समाजाची मान उंचावेल, असे वागावे कोणी कोणाचे नाही. तुमचे हाल होतात. तुम्हाला वेदना होतात. तुमची लेकरं अधिकारी बनलेले आता मला बघायचे आहे. आपली मुले प्रशासनात जाऊ द्यायचं नाही, अशी काही नेत्यांची इच्छा आहे. आपण मागे हटायचचं नाही. आपल्या विरोधात किती षडयंत्र केले जातेय, डावलले जातेय. शेतकरी, मराठा, १८ पगड जाती असो किंवा ओबीसी असो.सर्वजण आपल्या विरोधात टार्गेट केले जात आहेत पण आता यांना कळलं असेल यांना टार्गेट केलं तर संपलं. असा इशाराच यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळावा निमित्ताने दिला आहे.
आमच्या बापाच्या, समाजाच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का? जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी दिसू देणार नाही. कोणताही जाहगीरदांराची औलादं येऊ द्या, कुणीही झुकायचं नाही. कुणावर अन्याय करायचा नाही पण समाजावर अन्याय होणार असेल तर स्वतःचं संरक्षण करायचं शिका, तुम्हाला शिकावचं लागेल. मला नारायण गडावर मर्यादा पाळायच्या आहेत. पण जर न्याय मिळाला नाही. तर समुदायासाठी, लेकरासाठी उलथापालथं ही करावीच लागणार आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायण गडावर पहिल्यांदाच दसरा मेळावा आयोजित केला होता. तब्बल ९०० एकरात झालेल्या या सभेला राज्यभरातून लाखो मराठा बांधव उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला मोठा इशारा दिला. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकी वरुन ही मनोज जरांगे पाटील यांनी मोठी विधानं केली आहेत.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह