जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे:- पुणे येथील बोपदेव घाटात एका 21 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांना आता मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणी एका आरोपीला वारजे मधून अटक करण्यात आली आहे, तसेच उरलेल्या 2 आरोपींचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.बोपदेव घाटामध्ये तरुणीवर अत्याचार केलेले ३ आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. या तिघांवर याआधी सुद्धा चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तसेच यातल्या एकावर याआधी सुद्धा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या आरोपींनी 20 किलोमीटर अंतरासाठी 80 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास केला होता.
सदरील तिन ही आरोपी पोलिस रेकॉर्ड वरचे गुन्हेगार असून तिघांपैकी दोघांवरती याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे. हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका वाईन शॉप मध्ये दारू घेण्यासाठी एकत्र आल्याचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. या फुटेज मध्ये पीडितेच्या मित्रानं आरोपींना ओळखलं आणि त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. अख्तर, सोम्या आणि चंद्रशेखर अशी या 3 आरोपींची नावे आहेत.
घाट उतरल्यानंतर 3 आरोपी खेड शिवापूर येथे गेले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी तिघांनी वेगळा मार्ग धरला होता आणि ते रात्रभर फिरत राहिले होते. या दरम्यानच्या काळात त्यांनी मोबाईलचा ही वापर केला नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशियल इंटलिन्सचा वापर केला, तसेच 700 ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले होते.
बोपदेव बलात्कार प्रकरणातले 3 आरोपी हे मध्य प्रदेशचे असून मागच्या काही वर्षांपासून पुण्यात कचरा वेचण्याचं काम करतात. बोपदेव घाटातल्या घटनेच्या रात्री तिन्ही आरोपींनी येवलेवाडी येथील बिअर शॉपीमधून बिअर विकत घेतली होती. बिअर प्यायल्यानंतर 3 आरोपी बोपदेव घाटात गेले होते आणि त्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार केले होते. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर ते बोपदेव घाटातून खाली उतरले होते.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह