जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई ,अनेक दशकं उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही समाजसेवेची भावना ओतप्रेत अंगी भिनलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.मुंबई मधील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु बुधवार दि.९ रोजी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत ही मालवली आहे. तसेच त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या दानशूर कार्यानी रतन टाटांनी देशातच नव्हे तर संपुर्ण जगभरात आपली छाप सोडली आहे.
उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईत झाला होता. रतन टाटा १० वर्षांचे असताना, १९४८ मध्ये त्यांचे आई-वडील विभक्त झाले होते. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले होते. आजी नवजबाई टाटा यांनीच टाटांना दत्तक घेतले होते. त्यांचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईत झाले होते. पुढे बिशप कॉटन स्कूल, शिमला, नंतर कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस कॉलेजमधून त्यांनी आपले संपुर्ण शिक्षण पूर्ण केले होते. रतन टाटा यांनी अमेरिकेतील दहा वर्षांच्या वास्तव्यात रेस्टॉरंट मध्ये भांडी घासण्या पासून ते लिपिक पदाच्या नोकरी पर्यंत सर्व काही केले होते.परोपकार आणि दानधर्मा साठी रतन टाटा यांची विशेष ओळख होती. आपल्या कमाई मधील ठराविक वाटा ते दरवर्षी धर्मादाय कार्यात खर्च करत असत. चार वर्षांपूर्वी देशावर कोव्हिडचे संकट आलेले असताना रतन टाटा यांनी पीएम केअर फंडाला १०० कोटी रुपये दिली होती.
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १०) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह