जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बीडः– मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड येथे दसरा मेळावा घेणार असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले होते. होणाऱ्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून ३० सप्टेंबरला शिरुर (कासार) येथील पोलिस ठाण्यात सदरची परवानगी मराठा समाजाने मागितली होती, परंतू ८ दिवस उलटून गेले तरी पोलिसांची परवानगी मिळत नसल्याकारणाने मराठा समाज हा आक्रमक झाला होता. आज बुधवार दि.९ रोजी पोलिसांनी दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी दिली आहे.पोलिसांनी होणाऱ्या मराठा मेळाव्याला परवानगी देताना एक दोन नव्हे तर तब्बल सोळा अटी यामध्ये घातल्या गेल्या आहेत. होणाऱ्या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक भाषण तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणार नसल्याची देखील अट यामध्ये पोलिसांकडून घालण्यात आली आहे.
बीड पोलिसांनी मेळाव्यासाठी परवानगी देताना घातलेल्या अटी खालील प्रमाणे …
१) दसरा मेळाव्यासाठी येणारे वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी व्यवस्था करावी. सदर ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.
२) पार्किंग कडे जाणारे रोडवर बॅरीकेटसच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.
३) श्री क्षेत्र नारायणगडा कडे येणाऱ्या सर्व रस्त्यावरील गावांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणुन प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक नेमण्यात यावेत.
४)श्रीक्षेत्र नारायणगड येथे येणाऱ्या चारही मार्गावर टोईंग व्हॅन ठेवाव्यात
५) मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सभेसाठी येणारे कमीत कमी वाहने यांची निश्चिती करुन त्याची माहिती बंदोबस्त अधिकारी यांना आधीच द्यावी.
६) मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा ठिकाणी येण्याचा व परत जाण्याचा मार्ग निश्चित करुन त्याबाबत बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांना माहिती द्यावी.
७) मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी.
८)मेळाव्यामध्ये प्रक्षोभक भाषण तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणार नाहीत.
९) सर्वोच्य न्यायालयाच्या ध्वनीक्षेपक बाबतचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
१०) मेळाव्याचे ठिकाणी लावण्यात येणाऱ्या एलईडी सुरक्षीत अंतरावर लाऊन विद्युत प्रवाहाची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी.
११) मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या स्टेजच्या बाजुची विद्युत पोल वरील विद्युत वाहिनी प्रवाह बंद करुन विद्युत रोहीत्राच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमून त्यास हजर ठेवावे.
१२) आयोजकांकडून दसरा मेळाव्यासाठी येणारे लोकांना वाटप करण्यात येणाऱ्या अन्नातून विष बाधा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
१३) दसरा मेळावा कार्यक्रम संपन्न झाला नंतर स्वयंसेवक नेमलेल्या ठिकाणी गर्दी वाहतूक कमी होई पर्यंत हजर राहून प्रशासनास सहकार्य करणे बाबत सुचना द्यावी.
१४) दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांची व लहान मुलांची बसण्याची स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था करावी.
१५) श्री क्षेत्र नारायणगड मंदीराचे परिसरात स्वयंसेवकांची नेमणूक करावी.
१६) दसरा मेळाव्याच्या ठिकाणी आयोजीत करण्यात येणारे रावण दहन हे लोकांपासून सुरक्षित अंतरावर करुन सदर ठिकाणी सुरक्षित अंतरावर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात यावी.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह