जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, ता.२२ : हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा साक्षीदार असलेला राजगड किल्ला आता अधिकृतरीत्या इतिहासाच्या पानांतून वर्तमानात उतरला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर करून त्याला ‘राजगड तालुका’ अशी नवी ओळख मिळाली आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक घोषणा करताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला केंद्राने हिरवा कंदील दाखवत मंजुरी दिली असून राज्य सरकारने अधिकृत राजपत्र जारी केले आहे.
राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा पहिला राजधानी किल्ला आहे. या किल्ल्याशी जोडलेले असंख्य पराक्रम आणि शौर्यकथा महाराष्ट्राच्या जनमानसात आजही अभिमानाने स्मरल्या जातात. त्यामुळे वेल्हे तालुक्याला ‘राजगड’ हे नाव मिळणे म्हणजे शिवप्रेमींसाठी आणि समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले. स्वराज्याच्या पायथ्याशी असलेल्या जनतेसाठी ही घटना ऐतिहासिक ठरणार आहे. पुढील काळात राजगड तालुका पर्यटन, इतिहास व संस्कृतीच्या दृष्टीने अधिक ओळख निर्माण करेल, असा विश्वास राज्य शासनाने व्यक्त केला आहे.
या नामांतरामुळे ‘राजगड’ हे नाव केवळ किल्ल्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण तालुक्याची अस्मिता आणि ओळख बनणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह