जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
म्हसोबाचीवाडी ग्रामसभेत महिला सक्षमीकरण, स्वच्छता, सामाजिक जनजागृती यावर भर
इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत म्हसोबाचीवाडीची ग्रामसभा मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हनुमान मंदिरासमोरील सभामंडप येथे पार पडणार आहे. सरपंच श्री. राजेंद्र महादेव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या ग्रामसभेत गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठराव चर्चिले जाणार आहेत. तसेच या ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकारी सौ.सोनाली गवळी उपस्थित राहणार आहेत.
सभेची सुरुवात मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यापासून होईल. त्यानंतर नालसा न्यायजागृती योजना २०२५ संदर्भातील माहितीपत्राचे वाचन होणार आहे. समाजातील एकल महिलांविरुद्ध प्रचलित अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात ठराव पारित करून ग्रामस्थांकडून शपथ घेण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना ठरविल्या जाणार आहेत.
स्वच्छता व आरोग्याचा मुद्दा प्राधान्याने
ग्रामसभेत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या तरतुदीवर चर्चा होणार आहे. टी.बी. मुक्त पंचायत मोहीम, बालविवाह प्रतिबंधक उपक्रम, जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त धुरमुक्त गाव मोहीम अशा आरोग्यविषयक उपक्रमांना गती देण्याचे उद्दिष्ट या सभेत असेल.
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनाही गती
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. तसेच ‘माझी वसुंधरा अभियान’, ‘जनसुरक्षा मोहीम’ (प्रधानमंत्री जनधन योजना, विमा योजना, अटल पेन्शन योजना) याबाबतही मार्गदर्शन व अंमलबजावणी केली जाणार आहे.
गाव विकासाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय
ग्रामपंचायत विकास आराखड्यात भटक्या गुरांच्या समस्येवर उपाययोजना, चराई व निवारा स्थळांची ओळख, लसीकरण आणि टॅगिंग यावर ठोस चर्चा होणार आहे. तसेच पंचायत विकास निर्देशांक (PAI) रिपोर्ट सादर केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अपूर्ण घरकुल पूर्ण करणे व निकृष्ट घरकुल रद्द करणे याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
याशिवाय शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी निवडीबाबत, QR कोडसह डिजिटल नेमप्लेट प्रत्येक घरावर बसविण्याबाबत, तसेच वरिष्ठ कार्यालयांकडून आलेल्या पत्रांवर चर्चा करण्यात येईल.
लोकशाही प्रक्रियेत ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा
गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व विकासाशी निगडीत अशा २४ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याने सर्व ग्रामस्थांनी वेळेवर ग्रामसभेला उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क-७५८८६२२३६३

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 75