“सभासदांसाठी दिवाळीची गोड भेट – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची छत्रपती कारखान्याकडे ३०० रुपयांच्या हप्त्याची जोरदार मागणी!”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, ता.२१ :  छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना दिवाळीत आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस घालणाऱ्या सभासदांना तातडीने ३०० रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली आहे. आज कारखाना कार्यालयात झालेल्या बैठकीत स्वाभिमानीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मागणी कारखान्याच्या व्यवस्थापनासमोर ठेवली.
शेतकरी हा आज सर्वाधिक आर्थिक अडचणीत सापडलेला घटक आहे. खत, औषधे, मजुरी आणि दैनंदिन खर्च यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. अशा परिस्थितीत सभासदांनी आपल्या ऊसाची कष्टाची शेती करून कारखान्याला गाळपासाठी ऊस पुरवला आहे. मग अशा वेळी कारखान्यानेही शेतकऱ्याला आधार द्यायला हवा, हीच एक भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली.
कारखान्याचे कामकाज, नियोजन व व्यवस्थापन उत्तम पद्धतीने सुरु आहे. कामगारांना, अधिकाऱ्यांना आणि संबंधित घटकांना योग्य न्याय दिला जात आहे. परंतु सभासद शेतकरी मात्र आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी झगडत आहे. गेल्या दहा वर्षात दराचा तोटा सहन करत असताना शेतकऱ्यांनी कारखान्याला सातत्याने ऊस पुरवठा केला आहे. त्यामुळे सभासदांना या दिवाळीत ३०० रुपयांचा हप्ता मिळणे अत्यावश्यक आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशात थोडा दिलासा मिळेल व भविष्यात ऊस पुरवठा अधिक प्रोत्साहन मिळेल, असेही स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या मागणीवर कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्याचे आणि त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, जिल्हा सचिव राजेंद्र सपकळ, इंदापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब झगडे, उपाध्यक्ष विशाल भोईटे, संघटक मनोज घोळवे, सोशल मीडिया प्रमुख राहुल घोळवे, पुणे जिल्हा खजिनदार नितीन घोळवे, शिवाजी रुपनवर, सागर घोळवे, बापूराव घाडगे, गणेश गायकवाड, औदुंबर आव्हाड, कृष्णा कदम, भागवत मुळीक, संदीप सपकळ, वसंतराव देवकाते आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या ठाम मागणीमुळे छत्रपती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना दिवाळीत गोड दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – ७५८८६२२३६३
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें