जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सातारा/ प्रतिनिधी ता.२४:- मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा पुन्हा एकदा राज्यभर पेटणार आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे दि. २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असून, त्यांना साथ देण्यासाठी हजारो सातारकर बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. “आता जीआर मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही” अशी ठाम भूमिका मराठा समन्वयकांनी मांडली आहे.
साताऱ्यातील समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी आंदोलनाचा आराखडा जाहीर केला. या वेळी विवेकानंद बाबर, माऊली सावंत, किरण भोसले, सोहम शिर्के, विक्रम शितोळे, महेश जाधव, प्रकाश भोसले, राजेंद्र निकम, रवींद्र शेळके आदी उपस्थित होते.
विवेकानंद बाबर म्हणाले की, दि. २८ रोजी लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होणार असून, दि. २९ रोजी आझाद मैदानावर भव्य मोर्चा व उपोषण होणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय बैठकींसाठी कार्यकर्त्यांचे नियोजन सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथील शिवाजी चौकामध्ये कार्यकर्ते जमणार असून, शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम करून ते जुन्नर, चाकण, तळेगाव, खोपोली मार्गे मुंबईकडे कूच करणार आहेत.
यावेळी आंदोलनाचे धार्मिक स्वरूप अधोरेखित करत “आझाद मैदानावर रोज गणपतीबाप्पाची आरती होईल; जीआर मिळाल्याच्या दिवशीच बाप्पाचे समुद्रात विसर्जन केले जाईल” असे समन्वयकांनी जाहीर केले.
मराठा समाज हा राज्यातील जवळपास ३२ टक्के लोकसंख्येचा असून, तब्बल ५४ लाख नोंदी समाजाच्या बाजूने आहेत. “मराठा हाच कुणबी आहे” असा अध्यादेश तातडीने सरकारने काढावा, अशी मागणी करण्यात आली.
सातारकर समन्वयकांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. “जो विरोधात जाईल, त्याचा येणाऱ्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू” असा थेट इशाराही या वेळी देण्यात आला.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह