जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
सातारा:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे ८ मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होईल. महायुतीमध्ये सिटिंग सिट व गेटिंग सिट या सूत्रानुसार ६ जागांवरती विद्यमान आमदार रिंगणात असतील.कराड उत्तर आणि कराड दक्षिणसाठी महायुतीला उमेदवार जाहीर करावा लागू शकतो. साताऱ्यात महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि कोरेगाव या ४ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असतील याचं चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवतील. यावेळी विजयी झाल्यास ते सहाव्यांदा विधानसभेचे आमदार बनतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाटण मधून सत्यजीत सिंह पाटणकर व कोरेगाव विधानसभे मधून विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. जागा वाटपाच्या चर्चेत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचे सूत्र महाविकास आघाडीने स्वीकारल्यास या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत. कराड दक्षिणेतून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आसणार आहेत.
सातारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. साताऱ्यामध्ये २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून दीपक पवार यांनी निवडणूक लढवली होती. सध्या ते पुन्हा इच्छुक आहेत. त्यामुळे सातारा विधान सभेची जागा उद्धव ठाकरेंना मिळणार की शरद पवारांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सातारा विधानसभेची जागा उद्धव ठाकरेंना मिळाल्यास सचिन मोहिते हे उमेदवार असू शकतात.
गेल्या विधानसभा निवडणुकीत या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढल्या होत्या. वाईत मकरंद पाटील आणि फलटणला दीपक चव्हाण आमदार आहेत. ते दोघे सध्या अजित पवारांसोबत आहेत. वाई आणि फलटणमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मदन भोसले आणि जयंत पाटील यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. परंतू ही भेट वैयक्तिक असल्याचं सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे फलटण विधानसभा मतदारसंघात रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेतात यावर महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारां सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास दीपक चव्हाण महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहेत.
माण विधान सभेच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक जण इच्छुक आहेत. अनिल देसाई, अभय सिंह जगताप आणि प्रभाकर घार्गे हे तीन जण दावेदार आहेत. शरद चंद्र पवार कोणाला उमेदवारी देतात यावरती येथील उमेदवार निश्चित होणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह