वचने न पाळल्यास पद सोडणार!
नायगाव गणात राजकीय खळबळ; गणेश जाधवांचे ₹५०० स्टॅम्पवर शपथपत्र
जनसंघर्ष न्युज नेटवर्क
खंडाळा | ता.१ : निवडणूक प्रचारात आश्वासनांची सरबत्ती सुरू असताना नायगाव पंचायत समिती गणातून एक वेगळाच आणि लक्षवेधी राजकीय प्रयोग समोर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ‘मशाल’ चिन्हावरील उमेदवार गणेश अंकुश जाधव यांनी थेट ₹५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मतदारांसमोर शपथपत्र देत, वचने पाळली नाहीत तर पदाचा राजीनामा देण्याची जाहीर घोषणा केली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
“मी दिलेल्या प्रतिज्ञा पूर्ण केल्या नाहीत, भ्रष्टाचाराला थारा दिला किंवा जनतेचा विश्वासघात केला, तर मी स्वतःहून माझ्या पदाचा राजीनामा देईन,” अशी ठाम आणि आव्हानात्मक भूमिका जाधव यांनी सार्वजनिकरीत्या मांडली. निवडणूक जाहीरनाम्यांऐवजी थेट कायदेशीर शपथपत्र सादर करण्याची ही पद्धत नायगाव गणात नवा राजकीय पायंडा मानली जात आहे.
गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेल्या जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण” या विचारधारेनुसार काम केल्याचा उल्लेख शपथपत्रात केला आहे. तालुक्यातील विविध आंदोलनांत सहभाग, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेली लढाई आणि सत्तेपासून दूर राहून केलेले सामाजिक कार्य यावर त्यांनी भर दिला आहे.
शपथपत्रात पंचायत समितीतील लाचलुचपत, दलाली व पक्षपातीपणाला ‘शून्य सहनशीलता’ ठेवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. पदाचा गैरवापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी न करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. “काम नाही, तर मते नकोत,” असा स्पष्ट संदेश त्यांनी मतदारांना दिला.
जातीय वा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाला नकार देत, सर्वसमावेशक व विकासाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले आहे. जनतेशी थेट संवाद, तक्रारींचे वेळेत निवारण तसेच विकासकामांत गुणवत्ता व वेळेचे काटेकोर पालन हे शपथपत्रातील ठळक मुद्दे आहेत.
या अनोख्या भूमिकेमुळे नायगाव गणात “भाषण नव्हे, स्टॅम्पवर सही” आणि “जाहीरनामा नाही, थेट शपथपत्र” अशा प्रतिक्रिया उमटत असून, पारंपरिक राजकारणाला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता मतदारांच्या मनात एकच प्रश्न आहे—फक्त बोलणारा पुढारी, की कामासाठी सही करणारा प्रतिनिधी?
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 30,428









