इंदापुरात सत्ता समीकरणे बदलली! हर्षवर्धन पाटील-प्रवीण माने प्रदीप- गारटकर महायुतीने वाढवले भरणेंचे टेन्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३

इंदापूर, ता.१७ : इंदापूर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून आता थेट दोन मजबूत घराण्यांमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगण्याची चिन्हे आहेत. मा. मंत्री हर्षवर्धन पाटील तथा भाजप नेते प्रवीण माने हे एका व्यासपीठावर येताच या नव्या समीकरणामुळे राज्याचे कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय भरणे यांना मोठा राजकीय धक्का बसणार असल्याची चर्चा जोरात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातून आलेले भरत शहा यांचा औपचारिक पक्ष प्रवेश करून त्यांना भरणेंकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीला अडथळा ठरत आहे नव्याने उभी राहिलेली कृष्णा–भीमा विकास आघाडी, जी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरली आहे. या आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी गारटकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे त्यामुळे इंदापुरातील राजकारणात नवे वादळ घोंगावल्याचे पहावयास मिळत आहे.
१९८० पासूनचे वलय — गारटकरांचा घराघरातील प्रभाव
प्रदीप गारटकर हे गेल्या चार दशकांपासून राजकारणात सक्रिय असून १९८० मध्ये पतित पावन संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. संघटनात्मक बळ, व्यापक कार्यकर्ता संपर्क आणि नेतृत्व गुण यांच्या जोरावर त्यांनी इंदापूरमध्ये आपले स्वतंत्र वलय निर्माण केले. तब्बल १५ वर्षे नगरपालिकेवर एक सत्ता राखण्याची किमया गारटकर यांनी साधली असल्याने त्यांचा प्रभाव अजूनही ठळकपणे दिसून येतो.
भरणेंविरोधात सर्वपक्षीय एकवटले?
या नव्या समीकरणात विशेष धक्का म्हणजे भरणेंविरोधात विविध पक्ष आणि गट एकत्र येत, महायुती झाली आहे. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांच्या एकत्र येण्याने भरणेंच्या गटाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. आतापर्यंत भरणेंचे वर्चस्व काही प्रभागांत टिकून असले तरी संपूर्ण नगर परिषद पातळीवर विरोधी शक्ती एकत्र येत असल्याने भरणे गटाची निवडणूक रणनीती पूर्णपणे बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
इंदापुरातील सत्ता — दोन नेत्यांच्या हातात फिरलेली किल्ली
इंदापूर नगर परिषद ही गेली अनेक वर्षे दोन प्रमुख नेत्यांच्या राजकीय प्रभावाखाली राहिली — मा. मंत्री हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर. या दोन्हींकडे भक्कम कार्यकर्ता बळ, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क यंत्रणा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नेतृत्वाखालील शक्ती एकत्र आल्याने ही निवडणूक रंगणार हे निश्चित झाले आहे.
भरणेंसाठी निवडणूक आव्हानात्मक
भरणे गटाने भरत शहांवर विश्वास ठेवून त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत जरी मोर्चेबांधणी केली असली, तरी समोर उभा ठाकलेला गारटकर–पाटील–माने आघाडीचं मजबूत गठबंधन भरणेंच्या समीकरणांना कठीण बनवू शकते. त्यामुळे इंदापुरात सत्तेची माळ कोणाच्या गळ्यात पडते, यावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एकंदरीत, इंदापूर नगर परिषद निवडणूक ही यंदा केवळ विकासाच्या मुद्द्यांची नाही तर दोन मोठ्या राजकीय घराण्यांच्या प्रतिष्ठेची लढत बनली असून या टक्कर मध्ये कोणाच्या अंगावर विजयाचा गुलाल पडतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!